औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. या परीक्षा तीन दिवसांवर आल्या असताना जालना आणि बीड येथील महत्त्वाच्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्र वादग्रस्त ठिकाणी हलविण्यात आले आहेत. हा निर्णय नियमबाह्यपणे नेमलेल्या सल्लागार समितीने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या केंद्र बदलांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समजते.पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाल्या. या परीक्षेच्या एक दिवस आधीच ८ परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्यात आला होता. त्या बदलातही कॉप्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या वादग्रस्त केंद्रांचा समावेश होता. तो निर्णयही परीक्षा वाटपासाठी कायद्याचा भंग करून नेमलेल्या परीक्षा सल्लागार समितीने घेतल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर ३१ आॅक्टोबरपासून ३६ हजार पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. जालना येथील अंकुशराव टोपे महाविद्यालयात एम.कॉम. (सीबीसीएस) अभ्यासक्रमाची परीक्षा होणार होती. मात्र, या ठिकाणाहून परीक्षा केंद्र बदलून व्ही.एस.एस. महाविद्यालयात देण्यात आले. याचवेळी बीड येथील बलभीम आणि मिलिया महाविद्यालयात एमबीए अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. हे केंद्र बदलून वादग्रस्त आणि परीक्षेत हमखास गैरप्रकार होणाऱ्या आदित्य एमबीए महाविद्यालयात देण्यात आले. विशेष म्हणजे याठिकाणी गुंडागर्दीच्या माध्यमातून कॉपी करण्याचे प्रकार सर्रास चालतात, अशा ठिकाणी परीक्षा केंद्र बहाल करण्याची किमया परीक्षा वाटपासाठीच्या सल्लागार समितीने केली आहे.समितीची नियमबाह्य स्थापनाविद्यापीठात पदवी परीक्षांना सुरुवात होण्यापूर्वी परीक्षा मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांना कुलगुरूंनी विशेष निमंत्रित म्हणून बोलावले. या बैठकीत काही समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यात परीक्षा केंद्र वाटपासंदर्भात परीक्षा संचालकांना सल्ला देण्यासाठी समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अंभोरे यांची नियुक्ती केली. विद्यापीठ कायद्यामध्ये अशा पद्धतीची समिती स्थापन करण्याविषयी कोठेही तरतूद नाही. यास काही अधिष्ठातांनी विरोधही दर्शविला. मात्र त्यांचे मत विचारात घेतले नाही.जालना आणि बीड येथील पदव्युत्तरच्या परीक्षा केंद्रांमध्ये बदल केला आहे. हा बदल परीक्षा केंद्र वाटप सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार केला. आदित्य एमबीए हे केंद्र वादग्रस्त असल्याची माहिती नाही.- डॉ. जयश्री सूर्यवंशी, परीक्षा संचालक
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदव्युत्तरसाठीही बदलले परीक्षा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:48 PM
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. या परीक्षा तीन ...
ठळक मुद्देवादग्रस्त परीक्षा केंद्रांवर एमबीएची परीक्षा : बीड येथील प्रकार; सल्लागार समितीचा प्रताप