औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांमध्ये कार्यरत प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी करिअर अॅडव्हान्स स्किम (कॅश) ची अंमलबजावणी करण्यासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या ५ ते ८ मार्चदरम्यान विद्यापीठातील प्राध्यापकांचे कॅश होणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली.
विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी करिअर अॅडव्हान्स स्किम जाहीर केलेली आहे. या योजनेनुसार पात्र प्राध्यापकांना पदोन्नती देण्यात येते. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील तीन वर्षांपासून कॅश झालेले नाही. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संघटनेने अनेक वेळा कॅशसाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना निवेदन दिले होते. तरीही ‘कॅश’च्या अडथळ्यांची मालिका काही संपत नव्हती. त्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांनी प्रशासनाला ‘नॅक’च्या कामात सहकार्य न करण्याची भूमिकाही घेतली होती. याचा परिणाम विद्यापीठ प्रशासनाने सर्व अडथळे दूर करून ५ ते ८ मार्चदरम्यान कॅश आयोजित केले आहे.