छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या पदभरतीस स्थागिती देण्याची मागणी सत्ताधारी भाजपशी संबंधित विद्यापीठ विकास मंचतर्फे करण्यात आली. त्यानंतर सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. विक्रम काळे यांनी कुलगुरूंची भेट घेत भरती प्रक्रिया वेगात करण्याची मागणी केली. त्याशिवाय मंचच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनीही भरती स्थगितीला विरोध केला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये दुफळी असल्याचे स्पष्ट झाले. त्याशिवाय प्राध्यापक, विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेत पारदर्शकपणे पदभरती करण्याची मागणी केली.
विद्यापीठात १४ वर्षांनी होणाऱ्या प्राध्यापक भरतीला शासनाने मंजुरी दिल्यानंतर प्रक्रियेला प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यास विद्यापीठ विकास मंचने विरोध दर्शविला आहे. त्याविरोधात दोन दिवसांपासून विविध प्राध्यापक संघटना, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळांनी कुलगुरूंची भेट घेऊन पदभरती करण्याची मागणी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. विक्रम काळे यांनी अधिसभा सदस्य शेख जहुर, प्रा. बंडू सोमवंशी, विद्यापरिषद सदस्य डॉ. राजेश करपे यांच्यासह कुलगुरूंची भेट घेतली. तेव्हा त्यांनी प्राध्यापकांसह कर्मचाऱ्यांची भरतीही सुरू करण्याची मागणी केली. दुपारनंतर अधिसभा सदस्य तथा प्राध्यापक संघटनांचे पदाधिकारी डॉ. शंकर अंभोरे, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. भारत खैरनार, डॉ. चंद्रकांत कोकाटे, डॉ.दिलीप बिरुटे, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी डॉ. लोकेश कांबळे, पल्लवी बोराडकर, मनिषा बल्लाळ, अरुण मते, कृष्णा रकटे, गुणरत्न सोनवणे, सचिन बाेराडे, शरद शिंदे, गणेश शिंदे, शिवराज कुटे, विकास दराडे, नामदेव बागल आदींची उपस्थिती होती. या निवेदनांमध्ये स्वाभिमानी मुप्टा, मुप्टा, बामुक्टो, एसएफआय, मराठवाडा स्टुडंट असोसिएशन फाॅर स्टुडंट, पॅंथर्स विद्यार्थी आघाडी आदी संघटनांचा समावेश आहे.
सत्ताधारी पक्षांशी संबंधित काय म्हणतात?प्राध्यापक भरतीला विरोध नाहीच. फक्त भरती नियमानुसार झाली पाहिजे. एवढीच मागणी आहे.-बसवराज मंगरुळे, सदस्य, व्यवस्थापन परिषद, विद्यापीठ
राज्य शासनाने मंजूर केलेल्या जागा त्वरित भरल्यास बेरोजगारांचे स्वप्न पूर्ण होईल. विद्यापीठ निधीवरील ताण कमी होईल. भारती लांबल्यास नवयुवकांचे स्वप्न भंग होईल. त्यामुळे या जागा त्वरित भरल्याच पाहिजेत. विद्यमान कुलगुरूंची कारकीर्द अतिशय पारदर्शी राहिलेली आहे. त्यामुळे सर्वकाही व्यवस्थित होईल.-किशोर शितोळे, राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य
प्राध्यापक भरतीकडे पात्रताधारक डोळे लावून बसले आहेत. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता मिळाली तशीच कर्मचाऱ्यांच्या भरतीला मान्यता मिळावी म्हणून शासनाकडे पाठपुरावा करणार. प्राध्यापकांची भरती कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही.-विक्रम काळे, सत्ताधारी पक्षाचे आमदार
प्राध्यापक, विद्यार्थी संघटना काय म्हणतात?ज्यांनी भरती स्थगितीचे निवेदन दिले, ते अज्ञानातून दिले आहे. त्यांना विद्यापीठ कायद्याचे ज्ञान नाही. कोणतेही कुलगुरू, कुलसचिव हे प्रभारी नसतात. त्यामुळे विद्यापीठाच्या भल्यासाठी भरती झालीच पाहिजे. तसेच जे विद्यापीठाच्या प्राधिकरणावर नियुक्त असून, विद्यापीठाच्या विकासाविरोधात भूमिका घेतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.-प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, अधिसभा सदस्य
विद्यापीठातील प्राध्यापक भरती झालीच पाहिजे. ती पारदर्शक, गुणवत्तेच्या आधारावर, निपक्षपातीपणे आणि कोणत्याही गटातटाच्या प्रभावाशिवाय झाली पाहिजे.- डॉ. दिलीप बिरुटे, बामुक्टा
हजारो पात्रताधारक बेरोजगार आहेत. नोकरीसाठी प्रयत्न करतात. त्यांना नोकरी मिळत नाही आणि प्राध्यापकांच्या जागा निघाल्या तर काहीजण विरोध करतात. संबंधितांचा विरोध मोडून काढला जाईल.- सचिन बोराडे, विद्यार्थी संघटना