औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरऔरंगाबाद येथे मुक्कामी असताना त्यांची सेवा करणारे शिवराम (ऊर्फ मामा) आनंदा जाधव यांचे रविवारी (दि.१६) छावणीतील गड्डीगुडम भागातील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. छावणी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे, असा परिवार आहे.
मूळचे गाजगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील रहिवासी शिवराम आनंदा जाधव यांना सेवक म्हणून बाबासाहेबांची सेवा करायची संधी मिळाली. बाबासाहेबांच्या खोलीची झाडलोट करण्यापासून त्यांचे अंग चेपून देण्यापर्यंतची कामे शिवराम करायचे. शिवराम यांचे मामा किसनराव कांबळे ऊर्फ दंडू किसन हे बाबासाहेबांसोबत चळवळीत काम करीत. त्यांच्या शिफारशीने त्यांना बाबासाहेबांचा सेवक म्हणून नेमले गेले. १९५३ ते ५६ पर्यंत शिवराम बाबासाहेबांचे विश्वासू सेवक म्हणून कार्यरत होते. बाबासाहेबांची व माईसाहेबांची सेवा शिवराममामांनी शेवटपर्यंत निष्ठेने केली. पुढे मिलिंद महाविद्यालयाच्या सेवेतच त्यांना सामावून घेण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी शिवराममामा शेवटपर्यंत अभिमानाने सांगत. ‘मुलांनो, बाबासाहेबांप्रमाणे शिका, स्वाभिमानी व्हा,’ असाच सल्ला ते सर्वांना देत असत. उष्टे खाल्ले म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या कानामागे लगावलेली चापट व त्या चापटेने शिकवलेला स्वाभिमान आपण शेवटपर्यंत कसा टिकवला, ही आठवण सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावत असत.
त्यांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दात (त्यांची ही मुलाखत ‘लोकमत’च्या दि.१४ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.)
उष्टे खाल्ले म्हणून बाबासाहेबांनी थोबाडीत दिली...अंगावर शहारे आणणारा त्यांचा हा अनुभव...मिलिंद महाविद्यालयाचे बांधकाम सुरू असतानाचा हा प्रसंग मोठा बोलका आहे. एके दिवशी मी खेळाच्या मैदानातील काम संपविले. बाबासाहेबांचे अंगरक्षक पैलवान रुंजाजी (मामा) भारसाखळे यांनी मला बाबासाहेबांकडे पाठविले. तेव्हा मी वीसेक वर्षांचा असेन. मी खोलीत गेलो तेव्हा बाबासाहेब जेवत होते. आजारपणामुळे त्यांच्या खाण्यावर बरीच बंधने आली होती. ते बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी खात होते. त्यांचे जेवण झाले व ते हात धुण्यासाठी उठून बाजूला बेसिनकडे गेले. त्यांच्या ताटात चतकोर भाकर आणि दोन घास मेथीची भाजी उरली होती.माईसाहेबांनी मला बाबासाहेबांचे ताट उचलण्यास सांगितले. बाबासाहेबांच्या ताटातील भाकरी फेकून देणे माझ्या जिवावर आले. मी भाकर व भाजीचा एक घास घेतला. तोच बाबासाहेबांनी पाहिले. दुसऱ्याच क्षणी ओरडून माझ्याजवळ आले व खाडकन माझ्या गालावर थप्पड लगावली. ‘मूर्खा, उष्टे खातोस ताटातले,’ बाबासाहेब गरजले. मी घाबरलो व आणखी मार बसेल या भीतीने तेथून पळत थेट घरी गड्डीगुड्डमला आलो. माय व बापू मोळी आणण्यासाठी गेले होते. माझी भूक पळाली होती. रात्री मायला घडला प्रकार सांगितला. मी कामावर जाणे बंद केले. तिसऱ्या दिवशी चिटणीस साहेब आले. त्यांना पाहून माझे मामाही आले.बाबासाहेबांनी शिवरामला भेटण्यास बोलाविल्याचा निरोप माझ्या वडिलांना देऊन चिटणीस साहेब निघून गेले. दुसऱ्या दिवशी भीतभीतच वडिलांबरोबर मी बाबासाहेबांना भेटण्यासाठी गेलो. महाविद्यालयाच्या पायऱ्या चढताना मला दरदरून घाम फुटला.बाबासाहेबांच्या खोलीत गेलो. बाबासाहेब माझ्या वडिलांना म्हणाले, ‘काय रे आनंदा, शिवरामला दोन दिवसांपासून कामाला पाठविले नाहीस.’ बापू म्हणाले, ‘तो जरा घाबरला होता.’ त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘कशाला घाबरला?’ बापू म्हणाले, ‘तो म्हणतोय, तुम्ही? त्याला थप्पड मारली.’ पुन्हा बाबासाहेब म्हणाले, ‘अरे, पण त्याला का मारले ते विचारले का? मी जेवून उठल्यावर माझ्या ताटातले उष्टे खात होता तो. दुसऱ्याच्या ताटातले उष्टे किती दिवस खाणार तुम्ही? त्याला इतकी भूक लागली होती, तर त्याने जेवायला मागायचे. त्याला दुसरे ताट वाढून मिळाले असते.’मी बाबासाहेबांचे बोलणे गप्प ऐकत होतो. ते म्हणाले, ‘मी एवढा धडपडतो कशासाठी? लढतो कशासाठी? तुमच्या पिढीजात जुन्या सवयी कायमच्या नष्ट व्हाव्यात म्हणून. लेकरांना अशा घाणेरड्या सवयींपासून या वयातच परावृत्त केले पाहिजे. म्हणून मी शिवरामला थप्पड मारली. आता आयुष्यात तो कधीही कुणाचे उष्टे खाणार नाही.’‘मला माफ करा बाबा, मी येथून पुढे कधीच कोणाच्या उष्ट्याला हात लावणार नाही’, अशी शपथ मी घेतली. ती आजतागायत पाळतो आहे.