औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल नियुक्त चार जणांची नावे विद्यापीठाला प्राप्त झाली आहेत. या सर्वांनाच कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी नियुक्तपत्र दिले आहेत.
विद्यापीठाच्या अधिसभेवर जि.प. शिक्षण सभापती, नगरसेवक, विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी गटातील प्रत्येकी एका जणाची नेमणूक केली आहे. यामध्ये शिक्षण सभापती गटात बीडच्या पालकमंत्री व राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक बीड जि.प.चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांची नियुक्ती झाली. नगरसेवक गटात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे कनिष्ठ बंधू जालना नगरपालिकेतील नगरसेवक भास्करराव दानवे, विद्यापीठ शिक्षकेतर गटात वरिष्ठ सहायक सुनंदा सरवदे आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी गटात देवगिरी महाविद्यालयातील अधीक्षक कुंडलिक कचकुरे यांचा समावेश आहे.
अधिसभेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत विद्यापीठ विकास मंचला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. यामुळे या गटाची राज्यपाल आणि कुलगुरू नियुक्त सदस्यांवरच पूर्ण भिस्त आहे. यात पहिल्या चार जणांमध्ये दोन व्यक्ती या भाजपच्या संबंधित आहेत. यात बीड जि.प.चे शिक्षण सभापती असलेले राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे आहेत. मात्र, त्यांचा भाजपला पाठिंबा असून, मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांना शिक्षण सभापती बनवलेले आहे, तर नगरसेवक गटात थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बंधूचीच नेमणूक झाली आहे. यामुळे विद्यापीठ विकास मंचला व्यवस्थापन परिषदेच्या बहुमतासाठी आणखी मोठी कसरत करावी लागणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत उत्क र्ष पॅनलच्या एका समर्थकाची यात नेमणूक झाल्यामुळे त्यांच्या संख्याबळात एकने वाढ झाली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल नियुक्त चार जणांची नेमणूक झाली आहे.