छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व मतदारसंघात विधानसभेच्या उमेदवारीसाठी समाजवादी पक्षात प्रवेश केलेले डॉ. गफ्फार कादरी यांची त्या पक्षातील उमेदवारीही धोक्यात असल्याचे दिसत आहे.
दोन वेळा औरंगाबाद पूर्वमधून एमआयएमकडून निवडणूक लढविलेले डॉ. कादरी यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमकडून उमेदवारी मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी पक्षनेतृत्वावर टीका करत पक्षाचा राजीनामा दिला. शनिवारी त्यांनी तिकिटासाठी मुंबईत समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख अबू असीम आझमी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना औरंगाबाद पूर्वमधून समाजवादी पक्षाची उमेदवारी मिळेल, असे गृहीत धरले जात होते. तशी चर्चाही शहरात सुरू झाली होती. दरम्यान, काँग्रेसने या मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला आहे.
आज अबू असीम आझमी यांनी एक ‘ट्वीट’ करून समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असून, देशाच्या संविधानाच्या सुरक्षेसाठी पक्षाने महाविकास आघाडीला पूर्ण ताकदीनिशी साथ दिली असून, यापुढेही दिली जाईल, अशी ग्वाही दिली आहे. महाविकास आघाडीत पक्षाला मुंबईत मानखुर्द शिवाजीनगर आणि भिवंडी या दोन जागा मिळाल्या असल्याचे आझमी यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय आणखी काही जागांची अपेक्षा असून, त्याबाबत चर्चा चालू आहे. याशिवाय औरंगाबाद पूर्व आणि अन्य मतदारसंघांत जिथे पक्षाची ताकद आहे, तेथील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी इतर कोणत्याही बाबीकडे लक्ष देऊ नये. आझमी यांच्या या ट्वीटमुळे समाजवादी पक्षाची औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे डॉ. कादरी यांची या पक्षातील उमेदवारीही धोक्यात आहे.