औरंगाबाद, दि. ११ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी गणित विभागप्रमुख तथा मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.ज्ञानोबा भाऊराव धायगुडे (वय ७०) यांचे मंगळवारी (दि.११) निधन झाले. सेवानिवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले होते.
मूळचे बनसारोळा (ता.केज) येथील रहिवाशी असलेल्या डॉ. ज्ञानोबा धायगुडे यांनी प्रारंभी पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयात नोकरी केली. त्यानंतर त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गणित विभागात प्राध्यापक, विभाग प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजने विद्यापीठ समन्वयक, व्यवस्थापन परिषद सदस्य, अकॅडमिक स्टाफ कॉलेजचे संचालक आदी पदे भूषविली. सेवानिवृत्तीनंतर महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात (बाजारसावंगी) प्राचार्य म्हणून काम पहिले. विद्यापीठ अनुदान आयोगाचा एमिरेटस् प्रोफेसर, रासेयोचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला होता.
डॉ. धायगुडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. यातून बरे होत असतानांच पांढऱ्या रक्तपेशी कमी झाल्या. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्याच महिन्यात २७ एप्रिल रोजी त्यांच्या पत्नी रंजना धायगुडे यांचे कोरोनाने निधन झाले. डॉ. धायगुडे यांच्या पश्चात दोन मुले, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
राष्ट्रीय किर्तीचा गणितज्ज्ञ गमावला: कुलगुरूडॉ. धायगुडे यांच्या जाण्याने राष्ट्रीय किर्तीचा गणितज्ज्ञ आपण गमावला आहे. गणित विभाग व उपयोजित गणित विभागासाठी त्यांनी मोठे योगदान दिले असल्याचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. दरम्यान, गणित विभागातर्फे विभागात तर मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीच्या वतीने बुधवारी (१२) ऑनलाईन शोकसभा घेण्यात येईल, असे विभागप्रमुख डॉ. एस.के.पांचाळ व सोसायटीचे सचिव डॉ. एम. डी. जहागीरदार यांनी कळविले आहे.