डॉ. रघुनाथ बी. भागवत सर गेले आणि माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांचे ऋषीतुल्य गुरुवर्य, मेडिसीनच्या आधारवडाचे पर्व संपले. ते पुण्याहून आले आणि औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागात रुजू झाले. अल्पावधीतच भागवत सरांनी नावलौकिक मिळविला आणि सर्व स्तरातील रुग्ण त्यांच्याकडे यायला लागले. त्या वेळेस गुरुवर्य डॉ. आर. डी. लेले विभागप्रमुख होते. दोन वर्षांमध्येच भागवत सरांनी विभागप्रमुख पदाची धुरा सांभाळली. १९६३ मध्ये एम. डी. मेडिसीनची पहिली तुकडी घाटीत रुजू झाली. ही बॅच १९६६ ला परीक्षेला बसली, तेव्हा ‘एमसीआय’चे निरीक्षण झाले आणि मेडिसीन विभागास मान्यता मिळाली. दुसऱ्या वर्षी १९६७ ला ‘एमसीआय’चे परत निरीक्षण झाले आणि उत्कृष्ट दर्जाचा विभाग असा शेरा ‘एमसीआय’ने दिला. ती यशस्वी वाटचाल आजपर्यंत सुरू आहे.
भागवत सर शिस्तप्रिय, मितभाषी आणि सचोटीने वागणारे होते. सर सकाळी साडेआठ वाजता स्कूटरवरून डिपार्टमेंटला येत आणि लगेचच राऊंड घेत. आमची खूप धावपळ आणि तारांबळ उडायची. कारण त्यांना रुग्णाची माहिती व्यवस्थित द्यावी लागायची. काही चुकले तर ते राऊंडमध्ये रागवायचे नाही. पण नंतर बाजूला बोलावून सांगायचे. आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरून ते रागावले की समाधानी आहेत याचा अंदाज बांधायचो. त्यांची खरेतर आम्हाला भीतीच वाटायची. मला आठवते, मी तीन वर्षाच्या निवासी डॉक्टरच्या कारकिर्दीत एकदाच त्यांच्या कार्यालयात थेसीसवर सही घ्यायला गेले होते. मी मेडिसीनची पदव्युत्तर विद्यार्थिनी म्हणून १९७८ ते १९८० पर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. ते माझे पदव्युत्तर शिक्षक होते हे माझे भाग्य ! त्यानंतर १९८३ पर्यंत लेक्चरर म्हणून त्यांच्याच पथकात मी काम केले. २०१८ मध्ये त्यांच्या हस्ते आम्ही जिरियाट्रीक्स कक्षाचे उद्घाटन करू शकलो हे सुद्धा आमचं भाग्य ! त्यांना या विभागाविषयी खूप आत्मीयता होती. मी रुग्ण तपासणीबाबत जे काही शिकले ते भागवत सर आणि मोहगावकर सरांमुळेच.
सरांचे ज्ञान, बुद्धिमत्ता आणि क्लिनिकल ॲप्रोच प्रचंड ताकदीचे होते. रुग्णाची हिस्ट्री (माहिती) कशी सविस्तरपणे, जास्त न बोलता, पण जास्त ऐकून घ्यायची आणि त्यातील प्रत्येक माहितीला कसे महत्त्व द्यायचे, हे मी सरांकडून शिकले. त्यांचे पदव्युत्तर प्रशिक्षण अतिशय उच्च दर्जाचे असे. त्यांचे विद्यार्थी जगभरात पसरलेले होते आणि जेव्हा कधी ते भारतात यायचे किंवा भारतातील तज्ज्ञ डॉक्टर्सऔरंगाबादला येत, तेव्हा आमचे विशेष पदव्युत्तर प्रशिक्षणाचे कार्यक्रम सर आयोजित करीत असत. त्यामुळे आम्हाला अनेक नवीन गोष्टींची माहिती मिळत असे, नवीन माहिती, शोध लागत त्याविषयी ते त्यांच्या परदेशातील विद्यार्थ्यांकडून रिप्रिंट्स मागवत आणि आम्हाला अभ्यास करण्यासाठी देत.
आमच्या विद्यार्थी संसदेचे ते अध्यक्ष असत आणि अत्यंत शिस्तीत त्यांच्या देखरेखीखाली गॅदरिंग पार पडत असे. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. परंतु, त्यांच्या विद्यार्थ्यांना ते कायमचे स्मरणात राहतील. २०२० साली त्यांचा ९१ वा वाढदिवस होता; परंतु त्यांना कोविडमुळे भेटायला न जाता सर्व वर्गमित्रांनी त्यांना ई-मेलद्वारे आम्हाला ज्या काही त्यांच्या आठवणी होत्या त्या कळविल्या होत्या. त्यांनी सर्वांना पोहोच सुद्धा दिली होती. अगदी अलीकडेपर्यंत ते व्हाॅट्सॲपवर सक्रिय होते. त्यांची शिकवण आणि आठवण सदैव आमच्या सर्वांचे मार्गदर्शन करीत राहतील.- डाॅ. मंगला बोरकर, प्राध्यापक, वार्धक्यशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), औरंगाबाद