औरंगाबाद : प्रा. डॉ. राजन शिंदे यांचा खून केल्यानंतर त्यांच्या घराजवळील १०० फूट अंतरावरील जुन्या विहिरीत टॉवेलमध्ये गुंडाळून टाकलेले डंबेल्स आणि किचनमधील चाकू तब्बल ४८ तासांच्या अथक मेहनतीने सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. यासाठी महापालिकेने नेमलेल्या खाजगी कंत्राटदाराचे १२ कामगार रात्रंदिवस मेहनत घेत होते.
सिडको एन-२, तुकोबानगरातील रहिवासी डॉ. शिंदे यांचा मागील सोमवारी (दि. ११) पहाटे खून झाला होता. पोलिसांच्या विविध पथकांनी खुनाचा उलगडा करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले. शुक्रवारी रात्री विधिसंघर्षग्रस्त बालकाने खून केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनुसार त्याने खून करण्यासाठी वापरलेला चाकू, डंबेल्स हे रक्ताने माखलेल्या टॉवेलमध्ये गुंडाळून घराजवळील विहिरीत टाकल्याचेही सांगितले. यानुसार पोलिसांनी शनिवारी सकाळीच विहिरीतील पाणी उपसा करण्यास सुरुवात केली. यासाठी मनपाचे कंत्राटदार साईनाथ पवार यांनी विहिरीवर एक क्रेन बसविले. पाणी उपसण्यासाठी सुरुवातीला दोन वीज पंप बसविले. मात्र, पाण्याचा साठा आणि विहिरीची खोली अधिक असल्यामुळे २८ एचपीचे ८ वीज पंप वापरले. शनिवारी पहाटे विहिरीतील पाण्याने तळ गाठला. त्याचवेळी सुरू झालेल्या पावसामुळे विहिरीतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे मोटारींची संख्याही रविवारी सकाळी वाढविण्यात आली. रविवारी दिवसभर पाणी काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते.
पोलीस दलातील अधिकारी ठाण मांडून बसले होते. त्याच काळात अफवांचा बाजारही तेजीत होता. सायंकाळी ६ वाजता पाण्याचा पूर्ण उपसा झाला. क्रेनच्या साहाय्याने कचराही वर काढण्यात आला. मात्र, सायंकाळ झाल्यामुळे शस्त्रांचा शोध घेण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे कामगारांनी काम थांबविले. हे करताना रविवारी रात्रभर दोन वीजपंपाद्वारे पाणी उपसण्यात येत होते. सोमवारी सकाळीच पुन्हा कामाला सुरुवात झाली. पोलीस विभागातील अधिकारीही सकाळी ७ वाजताच घटनास्थळी पोहोचले. हे प्रकरण हाय प्रोफाइल बनल्यामुळे प्रसारमाध्यमांची तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे परिसर सील करण्यात आला होता. परिसरातील नागरिकांना विहिरीजवळ येण्यास मज्जाव केला होता. त्यासाठी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला. उपस्थितांना शस्त्रे केव्हा बाहेर काढणार याची उत्सुकता लागली होती. अखेर १२ वाजून २० मिनिटांनी क्रेनच्या टोपल्यात एक कामगार चाकू, डंबेल्स आणि टॉवेल घेऊन वर आला अन् सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तब्बल ४८ तासांच्या अथक परिश्रमानंतर गाजलेल्या खुनाच्या घटनेतील महत्त्वाचे पुरावे हाती लागले.
दोन अधिकारी विहिरीत उतरलेसोमवारी सकाळी विहिरीतील सर्व पाणी संपल्यानंतर कामगारांनी गाळ काढण्यास सुरुवात केली, तेव्हा एका कोपऱ्यात टॉवेलचे गाठोडे दिसून आले. त्या गाठोड्यात वजनदार डंबेल्स ठेवण्यात आले होते, तेव्हा कामगाराने पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके आणि अमोल मस्के यांना कळविले. तेव्हा या दोन्ही अधिकाऱ्यांनी ७० फूट खोल विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. दोन्ही अधिकाऱ्यांनी विहिरीत उतरून प्रत्यक्ष खात्री केल्यानंतर वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर सूत्रे वेगाने हलविण्यात आली.
आरोपीला सकाळी उचललेडॉ. शिंदे यांच्या खुनातील विधिसंघर्षग्रस्त बालकाला सोमवारी सकाळीच एका पथकाने घरातून ताब्यात घेतले होते. शस्त्र सापडल्यानंतर त्या बालकाला शस्त्र टाकलेल्या विहिरीवर गुन्हे शाखेच्या गाडीतून आणण्यात आले. त्याने विहिरीत टाकलेली शस्त्रे बोटानेच दाखविली. ही ओळख परेड इनकॅमेरा करण्यात आली. पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकासंदर्भातील कायद्यातील तरतुदींनुसार असलेल्या नियमांचे पालन केले.
हेही वाचा :- Dr. Rajan Shinde Murder Case: पोलिसांनी असा लावला खुनाचा छडा, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम- Dr. Rajan Shinde Murder Case: मित्र नसल्याने एकलकोंडेपणा आला; वेब सिरिज पाहिल्या अन् नको ते घडले