औरंगाबाद : राज्यभर गाजलेल्या प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या खुनाचे ( Dr. Rajan Shinde Murder Case ) गूढ आठ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सोमवारी (दि. १८) उलगडले. डॉ. शिंदे झोपेत असताना अल्पवयीन मुलाने (विधिसंघर्षग्रस्त बालक) डंबेल्सने वार करून बेशुद्ध केले. त्यानंतर चाकूने गळा, दोन्ही हाताच्या नसा, कान कापल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
औरंगाबादेतील मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (५१, रा. संत तुकोबानगर, एन २, सिडको) यांचा राहत्या घरी सोमवारी (दि. ११ आक्टोबर) पहाटे २.३० ते ३ वाजेच्या दरम्यान निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली होती. या खुनाचे गूढ उकलण्यात औरंगाबाद पोलिसांना आठ दिवसांनी यश आले. या खुनाची माहिती देण्यासाठी सोमवारी सायंकाळी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी पोलीस अधिकारी म्हणाले, खून झालेल्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर तपासात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पोलिसांनी विविध बाजूंनी तपास केला. यामध्ये अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली. अल्पवयीन मुलगा आणि मृतक यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. करिअर निवडण्यातून त्यांचे वाद टोकाला गेले होते. घटनेच्या दिवशी झोपण्यापूर्वी अल्पवयीन मुलगा आणि डॉ. शिंदे यांच्यात किरकोळ वाद झाला होता.
डॉ. शिंदे रागावल्याच्या तत्कालिक कारणातून ते झोपेत असताना त्यांच्या मानेच्या वरील भागात डंबेल्सने वार करण्यात आले. त्यानंतर चाकूने गळा, हाताच्या नसा कापल्या. पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, उस्मानपुऱ्यांच्या निरीक्षक गीता बागवडे, मुकुंदवाडीचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, मनोज शिंदे, श्रद्धा वायदंडे, अमोल सातोदकर, उपनिरीक्षक अनिता फासाटे, दत्ता शेळके, अमोल म्हस्के, पवन इंगळे, गणेश वाघ, वैशाली गुळवे, राहुल चव्हाण, गणेश वाघ, कल्याण शेळके, गजानन सोनटक्के आदी उपस्थित होते.
निरीक्षणगृहात रवानगीपोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्यानंतर सोमवारी दुपारनंतर बाल न्यायमंडळासमोर हजर केले. त्या मुलाची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
Dr. Rajan Shinde Murder Case: मित्र नसल्याने एकलकोंडेपणा आला; वेब सिरिज पाहिल्या अन् नको ते घडले