औरंगाबाद : मित्र नसल्यामुळे आलेला एकलकोंडेपणा व त्यातून सतत वेबसिरिज पाहण्याच्या आहारी गेलेला तो अल्पवयीन मुलगा मर्डर मिस्ट्री, ॲनिमेशनच्या साईट्स पाहत होता. त्याचे असे वागणे डॉ. राजन शिंदे यांना खटकायचे व ते विरोध करायचे. या मुलाने अभ्यास करून डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्याच्यावर दबावही टाकण्यात येत होता. या दबावातून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. या खटक्याचे पर्यवसान डॉ. शिंदे यांच्या खुनात झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
खून करण्यापूर्वी त्या मुलाने बाल हक्क, काळजी व संरक्षण कायद्याचा अभ्यास केला. खून केल्यानंतर आपणास कोणत्या प्रकाराला सामोरे जावे लागेल, याचाही अभ्यास केला होता, अशी माहिती समोर आली आहे. डॉ. शिंदे यांचे सामाजिक विश्व मोठे होते. सामाजिक कामांमध्ये त्याचा सतत सहभाग असायचा. हे करीत असताना त्यांचे कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. त्यातून कुटुंबात पती, पत्नी, मुलांमध्ये वाद होत असे. या वादाचे रूपांतर त्यांच्या खुनाच्या घटनेत झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. पती-पत्नीचे सतत वाद होत असल्यामुळे चुकीचे चित्र मुलांसमोर गेले. यातून मुलाच्या मनात तिरस्कार निर्माण झाला होता. या तिरस्कारातून तो सतत डॉ. शिंदे यांच्याशी वाद घालत होता. या दोघांतील संघर्षाचा गैरफायदा दुसऱ्या एका व्यक्तीने घेतला. त्या मुलाला डॉ. शिंदे यांच्या विरोधात सतत उचकावून देण्यात आले होते.
मागील दीड वर्षापूर्वी कोरोनाचे आगमन झाले आणि सर्वजण घरातच अडकून पडले. खून केलेल्या विधिसंघर्षग्रस्त मुलानेही या काळात इंटरनेटवर सतत मर्डर मिस्ट्री सिरीज, खुनाच्या विविध ॲनिमेशनसह इतर बाबी पाहिल्या. खून केल्यानंतर त्यातून कशा पद्धतीने सुटका करून घेता येते, याचाही अभ्यास केला होता. कोणताही मित्र नसल्यामुळे एकलकोंडपणा निर्माण झाला होता. काही कादंबऱ्यांचेही त्याने वाचन केले. या वाचनातून त्याने डॉ. शिंदे यांचा खून करण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी तो वेबसिरिज पाहत बसला होता. अभ्यास सोडून हेच पाहत बसतो म्हणून डॉ. शिंदे त्यास रागावले. यातून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद सतत होत असल्यामुळे घरातील इतर व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या डोक्यात हा राग गेल्यामुळे त्याने मध्यरात्रीनंतर २.३० ते ३ वाजेच्या दरम्यान डॉ. शिंदे यांच्या डोक्यात डंबेल्स घालून बेशुद्ध केले. त्यानंतरही त्याचा राग उतरला नाही, किचनमधील चाकू आणून गळा, हाताच्या दोन्ही नसा कापल्याची कबुलीही विधिसंघर्षग्रस्त मुलाने दिली.
नववीत असताना पळून गेलानववीत असताना विधिसंघर्षग्रस्त मुलाने फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्यासाठी पैशाची मागणी डॉ. शिंदे यांच्याकडे केली होती. ही मागणी धुडकावून लावल्यामुळे त्याने घरातील पैसे आणि सोने घेऊन पोबारा केला होता. या घटनेनंतर त्याने दहावीच्या वर्गात असताना नापास होऊन पाहायचे आहे, असे वाक्य दहावीच्या परीक्षेमध्ये लिहिले होते. नापास झाल्यानंतर काय होते, हे कुटुंबातील सदस्यांना दाखवून देण्याचाही इरादा त्याचा होता, असेही तपासात पुढे आले आहे.