औरंगाबाद : राज्यभर गाजलेल्या बहुचर्चित प्राध्यापक राजन शिंदे यांच्या खुनाचा उलगडा ( Dr. Rajan Shinde Murder Case ) करणे अत्यंत गुंतागुंतीचे होते. ११ ऑक्टोबर रोजी पहाटे स्वतःच्या घरात प्रा. शिंदे यांचा डोक्यात वार करून नंतर गळा, हाताच्या नसा कापल्याने आरोपीने अत्यंत शांत डोक्याने हे कृत्य केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता. तसेच चोरीची काहीही घटना नसल्याने या मागे परिचित व्यक्तीचा हात असल्याच्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला. या हायप्रोफाईल केसच्या तपासाचे सर्व सूत्र पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्त यांनी हाती घेत चार पथके स्थापन करून अत्यंत बारीक तपास केला. शस्त्रे सापडण्यापूर्वी पोलिसांनी संशयिताच्या विरोधातील या प्रकरणातील सर्व तांत्रिक पुरावे जमा केली होती. घटनेच्या ७ दिवसानंतर सोमवारी सकाळी ( दि.१८ ) घरा जवळील विहिरीतून डंबेल्स, चाकू अशी खुनासाठी वापरलेली शस्त्रे सापडताच पोलिसांनी विधीसंघर्ष मुलाला ताब्यात घेतले.
जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम : - डॉ. राजन शिंदे यांचा खून झाल्यानंतर पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला. संपत्ती, सामाजिक प्रतिष्ठा, पती-पत्नीच्या नोकरीच्या संस्थांमधील माहिती जमा केली. या सर्व चौकशीतून कोणताही धागा पोलिसांना मिळाला नाही.- त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. एका संशयितावर लक्ष केंद्रीत केले. विजयदशमीच्या दिवशी रात्री संशयिताने खुनाची कबुली दिली. इतर संशयितांकडून माहिती जमा केली. त्यानंतर पुरावे हस्तगत करण्यावर शिक्कामोर्तब केले.- शस्त्रे टाकलेल्या विहिरीतील पाण्याचा उपसा केल्यानंतर त्यातून शस्त्रे मिळाली. त्यानंतर विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.- पोलिसांच्या पथकाने केलेल्या तपासाचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी कौतुक करत संबंधितांना रिवॉर्ड देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना उपायुक्तांना दिल्या आहे.- उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनीही खुनाच्या तपासातील अधिकाऱ्यांना रिवॉर्ड देण्यासाठीची शिफारस करणार असल्याचे सांगितले.- ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, अर्पणा गिते, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, उस्मानपुऱ्यांच्या निरीक्षक गीता बागवडे, मुकुंदवाडीचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, मनोज शिंदे, श्रद्धा वायदंडे, अमोल सातोदकर, उपनिरीक्षक अनिता फासाटे, दत्ता शेळके, अमोल म्हस्के, पवन इंगळे, गणेश वाघ, वैशाली गुळवे, राहुल चव्हाण, गणेश वाघ, कल्याण शेळके, गजानन सोनटक्के आदींच्या पथकाने केली.
शस्त्र सापडल्यानंतर पुढे...शस्त्रे विहिरीतून बाहेर काढण्यापूर्वी विधि संघर्षग्रस्त बालकाला घटनास्थळी आणण्यात आले. त्यानंतर विहिरीतून डंबेल्स, चाकू आणि टॉवेल बाहेर काढण्यात आला. ही शस्त्रे पंचनामा करून सीलबंद करण्यात आली. रक्ताने माखलेला टॉवेल त्यापूर्वी सुकविण्यात आला. डंबेल्सचे वजन करण्यासाठी एका किराणा दुकानातून इलेक्ट्रॉनिक काटा आणण्यात आला होता. त्या काट्यावर वजन मोजले. तेव्हा ते ७ किलो भरले. किचनमध्ये वापरण्यात येणारा चाकूही विहिरीत सापडला. त्याची लांबी-रुंदी मोजून त्यास सीलबंद केले. दुपारी १२.२० वाजता ही सर्व शस्त्रे बाहेर काढल्यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत पंचनामा सुरू होता. सर्व पुरावे जमा केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ सोडले.
...अन् शांतपणे चालत आलात्या विधि संघर्षग्रस्त मुलाला विहिरीत शस्त्रे टाकल्याचे दाखविण्यासाठी जेव्हा आणण्यात आले, तेव्हा त्याच्या अंगात पांढरा टी शर्ट, जिन्स पॅन्ट, डोक्यावर पांढरी टोपी आणि ताेंडाला पांढरा रुमाल बांधलेला होता. त्यात चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. शांतपणे चालत आलेल्या बालकाने विहिरीत टाकलेली शस्त्रे खुणेने दाखवली. त्यानंतर त्याला गुन्हे शाखेच्या गाडीत बसविण्यात आले. तेथेही तो शांतपणे बसून होता. सोबतच्या अधिकाऱ्यांसही तो चकार शब्द बोलला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा :- Dr. Rajan Shinde Murder Case: डंबेल्सने वार करून केले बेशुद्ध, नंतर चाकूने कापला गळा; विधीसंघर्षग्रस्त मुलगा ताब्यात- Dr. Rajan Shinde Murder Case: मित्र नसल्याने एकलकोंडेपणा आला; वेब सिरिज पाहिल्या अन् नको ते घडले