छत्रपती संभाजीनगर : डाॅक्टर साहेब, सरकारी अधिकारी बनायचे आहे. काहीही करून हा चष्मा घालवा, असे म्हणत अनेकजण नेत्रतज्ज्ञांकडे डोळ्याची शस्त्रक्रिया करून चष्मा घालविण्यासाठी येत आहेत. हे एकच कारण नाही, तर इतर कारणांमुळे चष्मा घालविण्याची शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.
बदलत्या जीवनशैलीसह अनेक कारणांमुळे कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. दृष्टिदोष असलेल्यांसाठी चष्मा लावणे महत्त्वपूर्ण ठरते; परंतु हाच चष्मा अनेकांना नकोसा होतो. त्यासाठी अनेक कारणे पुढे केली जातात. त्यामुळे डोळ्याची शस्त्रक्रिया करून चष्माच घालविण्याचे प्रमाण आता वाढत आहे. ही एक ‘कॉस्मॅटिक प्रोसिजर’ किंवा चष्म्याची निर्भरता कमी करणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करावी की, नाही हे व्यक्तीच्या पसंतीवर आणि प्राधान्यावर अवलंबून असते, असेही नेत्रतज्ज्ञांनी स्पष्ट केले.
का नको वाटतो चष्मा?- लग्न जुळण्यास अडथळा.- सौंदर्यात बाधा.- अभिनेता, अभिनेत्री, माॅडेल बनायचे म्हणून.- सरकारी नोकरीसाठी अडथळा.- चष्म्यावरून वारंवार विनोदाचा विषय.- चष्मामुळे प्रगती होत नसल्याची भावना.यासह विविध छोटी-मोठी कारणे.
महिन्याला किती शस्त्रक्रिया?छत्रपती संभाजीनगरमध्ये ही शस्त्रक्रिया करणारे जवळपास २५ डाॅक्टर आहेत. मात्र, काही मोजक्या रुग्णालयांतच आजघडीला शस्त्रक्रिया होत आहेत. महिन्याकाठी ५० शस्त्रक्रिया होत असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.
...तरच सर्जरीचष्म्याचा नंबर एक वर्षांपर्यंत स्थिर असेल, त्यात कोणताही बदल होत नसेल तर शस्त्रक्रिया करून चष्मा घालविता येतो. या शस्त्रक्रियेमुळे नंबर शून्य होऊन जातो. म्हणजे चष्मा वापरण्याची गरजच पडत नाही.- डॉ. अरुण अडचित्रे, अध्यक्ष, नेत्ररोगतज्ज्ञ संघटना
प्रमाण वाढलेचष्मा घालविण्याची, नंबर कमी करण्याची शस्त्रक्रिया म्हणजे लॅसिक सर्जरी करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण काहीसे अधिक आहे.- डाॅ. मनोज सासवडे, नेत्ररोगतज्ज्ञ
शहरातील नेत्ररोगतज्ज्ञ - १४५चष्मा घालविणारी शस्त्रक्रिया करणारे नेत्रतज्ज्ञ - २५