लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आज स्पर्धात्मक विद्यार्थी घडत आहेत. विज्ञानात पैकीच्या पैकी गुण असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात एकदाही प्रयोग केलेले नसतात. विज्ञानाची गोडी लागावी यासाठी विज्ञान केंद्र महत्त्वाचे असून, महात्मा गांधी मिशन परिसरात सुरू झालेले डॉ. एपीजे अब्दुल कलाम सायन्स सेंटर भविष्यातील विज्ञानाचे विद्यार्थी आणि मार्गदर्शक घडविण्यात महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास भारतीय विज्ञान प्रसार मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे यांनी व्यक्त केला.डॉ. रानडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२२) विज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, अनुराधा कदम, विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर, जेएनईसी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य हरिरंग शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, डॉ. प्राप्ती देशमुख, रणजित कक्कड, सचिन मालेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.विज्ञान कें द्राच्या उद््घाटनानंतर डॉ. रानडे यांनी रुक्मिणी सभागृह येथे विद्यार्थ्यांना ‘खगोल, अंतराळ विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी’ याविषयी मार्गदर्शन केले. जीपीएस तंत्रज्ञान, सोलार सेल, कॅमेरा लेन्सेस किंवा विज्ञानाच्या इतर अनेक शाखांचे मूळ हे खगोलशास्त्रात असून, सध्या भारत या क्षेत्रात खूप मोठे प्रकल्प राबवीत आहे. त्यामुळे येत्या दहा वर्षांत विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असे डॉ. रानडे यांनी नमूद केले. तसेच संशोधनात कोणतीही कॉपी चालत नसल्याने खरोखर आवड असेल आणि या क्षेत्राबाबत कुतूहल आणि समजून घेण्याची वृत्ती असेल, तरच या क्षेत्रात या, असेही त्यांनी सुचविले. दरम्यान अंकुशराव कदम यांनी विज्ञान कें द्राची संकल्पना स्पष्ट केली. औंधकर यांनी विज्ञान कें द्राच्या कार्यप्रणालीवर मार्गदर्शन केले. बोराडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.काय आहे विज्ञान कें द्रविद्यार्थ्यांना हसत खेळत विज्ञान शिकवून विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी अंकुशराव कदम यांच्या कल्पकतेतून आणि श्रीनिवास औंधकर यांच्या परिश्रमातून साकारलेले हे विज्ञान केंद्र सर्वच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. विज्ञान खेळणी, रंजक उपकरणे, खगोल, अंतराळ, भौतिकशास्त्र, गणित या सर्वच विषयांची स्वतंत्र दालने, थ्रीडी दालन, सुसज्ज तारांगण, सूर्याचे अध्ययन करणारी सौर वेधशाळा, औरंगाबादचा स्थानिक वेळ सांगणारी सौर घड्याळ असे सर्वच या कें द्रात असून ते मराठवाड्यातील एकमेव केंद्र आहे. सोमवार सोडून उर्वरित दिवस हे केंद्र सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि खगोलप्रेमींसाठी खुले आहे.
डॉ. कलाम विज्ञान केंद्रातून घडतील विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:37 AM