छत्रपती संभाजीनगर : शहरात मोठा पाऊस झाल्यास सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे महापालिकेने यंदा २ एप्रिलपासून कंत्राटदार न लावता स्वत:ची यंत्रणा लावून नालेसफाईला सुरुवात केली. १९४ किमीपैकी जवळपास १७५ किमी नाल्यांची सफाई पूर्ण झाली. जिथे पोकलेन, जेसीबी जात नाही, त्या ठिकाणी कर्मचारी लावून नालेसफाई केली जात आहे.
महापालिकेतील अधिकारी आणि काही कंत्राटदार दरवर्षी नालेसफाईची चातकाप्रमाणे वाट पाहत असत. दरवर्षी २ ते ३ कोटी रुपये नालेसफाईवर खर्च करण्यात येत होता. तत्कालीन आयुक्तांनी ही उधळपट्टी लक्षात घेऊन कंत्राटदार पद्धत बंद केली. एवढ्या रकमेत मनपाची यंत्रणा लावून काम करण्याचे निर्देश दिले. नवीन जेसीबी, पोकलेन खरेदी करण्यात आले. मागील काही वर्षांपासून मनपाच नालेसफाई करीत आहे. प्रशासक जी. श्रीकांत यांनी नालेसफाईचे आदेश दिले. त्यानुसार २ एप्रिलपासूनच नालेसफाईचे काम सुरू झाले.
शहरात १९४ किमीचे लहान-मोठे मिळून ९४ नाले आहेत. नाल्यांमधून मोठ्या प्रमाणात केरकचरा आणि गाळ काढण्यात आला. हा गाळ खाम नदीपात्राच्या परिसरात उद्यान, रोपवाटिकेसाठी वापरण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता आर.एन. संधा यांनी सांगितले. मोठ्या नाल्यांचे काम जेसीबी आणि पाेकलेनच्या साह्याने करण्यात आले. आता अंतिम टप्प्यातील लहान-लहान नाले कर्मचारी लावून साफ करण्यात येत आहेत. प्रत्येक वॉर्ड अभियंत्याला २ ते ५ लाख रुपये ॲडव्हान्स दिले आहेत. ३१ मे पर्यंत नालेसफाई पूर्ण होईल, असा विश्वास संधा यांनी व्यक्त केला. मागील काही वर्षांपासून नाल्यांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला. त्यामुळे पाऊस मोठा असला तरी पाणी नाल्याबाहेर येणार नाही.
१० जेसीबी, ५ पोकलेनमनपाच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी सांगितले की, एप्रिलपासून सुरू केलेल्या नालेसफाईसाठी १० जेसीबी, ५ पोकलेन, १० टिप्पर, ५ ट्रॅक्टर देण्यात आले आहेत. पोकलेन आणि ट्रॅक्टर किरायाने मागविण्यात आले आहेत.