वाळूज महानगर : वाळूजच्या गंगा कॉलनीत ड्रेनेजलाईन व रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरपंच सईदाबी पठाण यांनी बुधवारी (दि.९) या कॉलनीत भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी सरपंच पठाण यांनी ग्रामपंचायतीला निधी प्राप्त होताच रखडलेल्या ड्रेनेजलाईन व रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
--------------------------
रांजणगावात अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा
वाळूज महानगर : रांजणगावातील ग्रामपंचायत कार्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ विविध विक्रेत्यांनी अतिक्रमणे करून व्यवसाय थाटल्याने रहदारीस अडथळा होत आहे. या रस्त्यावर हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी कब्जा केल्याने दररोज सकाळी व सायंकाळी ये-जा करणाऱ्या वाहनधारक व नागरिकांना कसरत करावी लागत आहे. रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध ग्रामपंचायत प्रशासन कारवाई करीत नसल्याने नागरिक व वाहनधारक त्रस्त झाले आहे.
---------------------------
जोगेश्वरी रस्त्यावर कचऱ्याची विल्हेवाट
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील जोगेश्वरी रस्त्यावरील मोकळ्या भूखंडावर कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. एमआयडीसीच्या या मोकळ्या भूखंडावर कारखान्यात टाकाऊ वस्तू तसेच लगतचे व्यावसायिक केर-कचरा आणून टाकत असतात. या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून जोगेश्वरीकडे जाणारे नागरिक तसेच कारखान्यात ये-जा करणाऱ्या कामगारांना नाक दाबूनच या मार्गावरून ये-जा करावी लागत आहे.
--------------------------
बजाजनगरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार
वाळूज महानगर : बजाजनगरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातील मोहाटादेवी चौक, मोरे चौक, जयभवानी चौक, लोकमान्य चौक आदी ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसतात. नागरी वसाहतीत या मोकाट जनावरांचा वावर वाढला असून सोसायटीतील झाडे व बागांची जनावरे नासधूस करीत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
-----------------------
घाणेगावातील वीज पुरवठा सुरळीत करा
वाळूज महानगर : घाणेगावात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. महावितरणकडून घाणेगावात एकलहेरा-नांदेडा या लाईनवरून वीज पुरवठा करण्यात येतो. लगतच असलेल्या विटावा लाईनवरून वीज पुरवठा करण्याची मागणी सोपान सातपुते, बाळसाहेब गोरे, राजू दाणे व त्रस्त नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
-----------------------------