खुलताबाद व विरमगावच्या लोकांचे आरोग्य धोक्यात
खुलताबाद, विरमगावसह वीस गावांचे आरोग्य धोक्यात : सरपंचांनी दिला आंदोलनाचा इशारा
खुलताबाद : टाकळी राजेराय ग्रामपंचायतीच्यावतीने गेल्या काही महिन्यांत ड्रेनेज लाईनचे नवीन बांधकाम केले. परंतु त्याचे आऊटलेट चक्क गिरिजा नदीत सोडल्याने नदीकाठच्या वीस गावांतील व खुलताबाद शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. टाकळी राजेराय ग्रामपंचायतीने जर ड्रेनेज पाणी सोडणे बंद केले नाही, तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विरमगावच्या सरपंच सविता देवीदास आधाने यांनी दिला आहे.
सरपंच आधाने यांनी खुलताबाद तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, टाकळी राजेराय ग्रामपंचायतीला निवेदन देऊन तक्रार नोंदविली आहे. निवेदनात म्हटले आहे की, टाकळी राजेराय ग्रामपंचायतीने गेल्या काही महिन्यांपूर्वी गावात ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण केले असून यासाठी कुठलाही शोष खड्डे न करता ड्रेनेजचे पाणी थेट गिरिजा नदीच्या पात्रात सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे पाणी पावसाळ्यात वाहून थेट गिरिजानदीत जात आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. विरमगाव येथील गिरिजा नदीच्या काठावर शिवसंगमेश्वर महादेवाचे जागृत मंदिर असून नदीकाठी विविध धार्मिक पूजा, दशक्रिया विधी केला जात असते. त्यामुळे नदीच्या पाण्यात भाविक व ग्रामस्थ स्नान करतात. त्याचबरोबर जवळच सार्वजिनिक विहीर असल्याने लोकांना या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
----
गिरिजातून खुलताबाद शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा
टाकळी राजेराय ग्रामपंचायतीने ड्रेनेजचे पाणी गिरिजा नदीच्या पात्रात सोडले. पाणी थेट गिरिजा मध्यम प्रकल्पात जात असल्याने खुलताबाद शहरासह तालुक्यातील जवळपास वीस गावांना गावांना गिरिजा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असल्याने खुलताबाद शहरासह इतर गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.