औरंगाबाद : पाच वर्षांपूर्वी लग्न होऊनही मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून आपल्याला सोडून देतील, या भीतीपोटी तिने चक्क गर्भवती असल्याचे नऊ महिने नाट्य रंगविले. या नाटकाचा शेवटही चांगला व्हावा, यासाठी तिने चक्क आपले अपहरण करून एका हॉस्पिटलमध्ये प्रसूती करण्यात आली आणि अपहरणकर्त्यांनी आपली जुळी बालके पळवून नेल्याचा बनाव केला. तिचा हा बनाव पोलिसांच्या प्रश्नांपुढे फार काळ टिकला नाही आणि शेवटी तिने रडतच संसार टिकावा म्हणून आपण हे बनाव केल्याचे कबूल केले. वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण येथील कविता कटारे ही पतीसह १७ रोजी सकाळी सिडको पोलीस ठाण्यात आपले अपहरण झाल्याची आणि अज्ञातांनी जुळ्या बाळांना पळवून नेल्याची तक्रार घेऊन आली. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनेची चौकशी सुरू केली. घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली. भर दिवसा फिल्मी स्टाईलने एका गर्भवतीचे अपहरण करून दीड तासात तिची प्रसूती करणे आणि तिच्या बाळांना घेऊन तिला सोडून देण्यात आल्याचे तिचे सांगणे पोलिसांना संशयास्पद वाटत होते. मात्र या तक्रारीची पूर्णपणे खात्री करण्यासाठी परदेशी या गुरुवारी रात्री तिच्या गावी गेल्या. या दाम्पत्याची त्यांनी कसून चौकशी केली तेव्हा तिने संसार टिकावा म्हणून गर्भवती असल्याचे नाटक केल्याची कबुली दिली. पोनि. निर्मला परदेशी म्हणाल्या की, संसार टिकावा म्हणून कविताला गर्भवती असल्याचे नाटक करावे लागले. या दाम्पत्याने पाच वर्षांत मूल व्हावे म्हणून उपचार केलेच नाहीत. त्यामुळे तिच्या उपचारासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत. शुक्रवारी तिची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सोनोग्राफी तपासणीमध्ये ती कधीच गर्भवती नव्हती आणि तिची प्रसूती झालेली नसल्याचे समोर आले आहे.
संसार टिकावा म्हणून केले प्रसूतीचे नाटक
By admin | Published: December 18, 2015 11:42 PM