- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : विधानसभा निवडणूक संपताच महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. मनपा प्रशासनासाठी ही निवडणूक यंदा तारेवरची कसरत ठरणार आहे. पहिल्यांदाच शहरात पॅनल पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. ४० हजार मतदारांचा एक प्रभाग राहणार आहे. या एका प्रभागात चार नगरसेवक राहतील. अनुसूचित जाती जमातींचे वॉर्ड बाजूला ठेवून इतर विविध आरक्षणांसाठी डिसेंबरमध्येच ड्रॉ काढण्यात येणार आहे.
शहरात १२४ नगरसेवकांच्या दृष्टीने ३१ प्रभाग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मनपा प्रशासन राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांची वाट पाहत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात आयोग ड्रॉ घेण्याच्या तयारीत आहे. सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. महानगरपालिकेची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपणार आहे. २०२० मध्ये महापौरपद आरक्षित राहील का खुले यादृष्टीनेही आतापासूनच राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे. लवकरच यासंबंधीची घोषणाही होणार आहे. पॅनल पद्धतीत सातारा-देवळाईत ४ नगरसेवक असतील. शहरातील बहुतांश वॉर्डांची रचनाही बऱ्यापैकी बदलणार आहे. शहरात १२४ नगरसेवकांच्या दृष्टीने ३१ प्रभाग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२ लाख २८ हजार आहे. मनपा निवडणुकीसाठी हीच आकडेवारी गृहीत धरली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मनपा निवडणुकीतील वॉर्डांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. चार महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा विचार प्रशासन करीत आहे.
३0 प्रभाग १२0 नगरसेवकप्रथमच निवडणूक पॅनल पद्धतीने घेतली जाणार असल्यामुळे वॉर्ड राहणार नाहीत. चार वॉर्ड एकत्रित करून एक प्रभाग तयार केला जाणार आहे. एकूण ३१ प्रभाग राहण्याची शक्यता आहे. ३१ प्रभागांनुसार १२४ नगरसेवक निवडून येतील. ३० प्रभाग केल्यास १२० नगरसेवक निवडून येतील. प्रभाग रचनेवरच विद्यमान नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून आहे. यावर सर्वच राजकीय पक्षांचे गणित अवलंबून राहणार आहे.