- राम शिनगारे
औरंगाबाद : पदवी परीक्षा संपल्यानंतरही ४ लाख ८९ हजार ९६७ उत्तरपत्रिका शिल्लक असताना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने १ कोटी ६८ लाख रुपये किमतीच्या ३८ लाख उत्तरपत्रिकांची खरेदी करण्याचा घाट घातला आहे.
विशेष म्हणजे मार्च/एप्रिल महिन्यापर्यंत कोणत्याही परीक्षा नसतानाही यासाठीची निविदाची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र व्यवस्थापन परिषद सदस्याने शिल्लक उत्तरपत्रिकांची माहिती मागविल्यामुळे ही खरेदी प्रक्रियाच थांबविण्यात आली. तरीही २ लाख उत्तरपत्रिका खरेदी करण्यात आल्या आहेत.
उत्तरपत्रिका शिल्लक असतानाही परीक्षा विभागाने तब्बल २४ पानांच्या ३० लाख, ३६ पानांच्या ३ लाख आणि ८ पानांच्या ५ लाख उत्तरपत्रिका खरेदी करण्याचा घाट घातला होता. याविषयीच्या निविदा कुलगुरूंकडे मंजुरीसाठी आल्या होत्या. याची माहिती व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांना समजली. त्यांनी विद्यापीठाशी संलग्न पाच महाविद्यालयांकडून शिल्लक उत्तरपत्रिकांची माहिती घेतली असता, परीक्षेनंतरही शिल्लक उत्तरपत्रिकांचा आकडा मोठा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नव्याने खरेदी करणाऱ्या ३८ लाख उत्तरपत्रिकांच्या निविदेला डॉ. अंभोरे यांनी विरोध दर्शविला.
यामुळे सुमारे १ कोटी ६८ लाख रुपये किमतीच्या उत्तरपत्रिका खरेदीला ब्रेक लागला. मात्र याच वेळी परीक्षा विभागाकडे उत्तरपत्रिका शिल्लक असाव्यात, यासाठी २४ पानांच्या २ लाख उत्तरपत्रिकांची खरेदी करण्यात आली. यामुळे सद्य:स्थितीत परीक्षा विभागाकडे २४ पानांच्या ६ लाख १६ हजार ९६७ आणि ८ पानांच्या ७३ हजार उत्तरपत्रिका उपलब्ध आहेत. ३६ पानांच्या उत्तरपत्रिका मात्र, संपल्या आहेत, अशी माहिती परीक्षा विभागातील सूत्रांकडून मिळाली.
उत्तरपत्रिकांचे असे आहेत दरविद्यापीठ २४ पानांची उत्तरपत्रिका ४ रुपये ७५ पैसे, ३६ पानांची ६ रुपये आणि ८ पानांची उत्तरपत्रिका २ रुपयांना खरेदी करते. एका सत्र परीक्षेला काही दिवसांपूर्वी संपलेल्या परीक्षेनुसार अंदाजे १५ लाख उत्तरपत्रिका लागतात. यामुळे ५ लाख उत्तरपत्रिका शिल्लक असताना ३८ लाख उत्तरपत्रिका खरेदीचा घाट कोणासाठी घालण्यात आला होता, हे कोडे नाही.
यापुढे एकही उत्तरपत्रिकांची खरेदी होणार नाहीविद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मागील दहा वर्षांत खरेदी केलेल्या उत्तरपत्रिकांचा आकडा आचंबित करणारा आहे. निव्वळ कमिशनसाठी कोट्यवधी रुपयांच्या उत्तरपत्रिका खरेदी करण्यात येतात. यामुळे अवघ्या सव्वाकोटी रुपयांत विद्यापीठाची प्रिंटिंग प्रेस अद्ययावत होऊ शकते. त्यासाठी व्यवस्थापन परिषदेत प्रयत्न करण्यात येतील. येत्या १२ डिसेंबर रोजीच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत ठराव मांडण्यात येणार आहे. मार्च/एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी आपल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापलेल्या उत्तरपत्रिकाच उपलब्ध होतील. यापुढे एकही उत्तरपत्रिकांची खरेदी करावी लागणार नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. अंभोरे यांनी दिली.