छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या पदवी परीक्षांतील तृतीय वर्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये बी.ए.च्या तृतीय वर्षात परीक्षेचा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४२.६५, बी.एस्सी.चे ४१.९९ टक्के आणि बी.कॉम.चे ३३.१२ टक्के विद्यार्थी नापास झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. परीक्षांमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट झाल्याच्या चर्चा होतात. मात्र, कॉप्या करूनही विद्यार्थ्यांना लिहिता येत नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
विद्यापीठाने मार्च-एप्रिल महिन्यांत घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर मूल्यांकन प्रक्रिया पार पडली. बी.ए., बी.एस्सी. आणि बी.कॉम. अभ्यासक्रमांचा निकाल गुरुवारी सकाळी घोषित करण्यात आला आहे; तसेच उर्वरित अभ्यासक्रमांचेही निकाल घोषित केले आहे. पदवी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन बीड, धाराशिव, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील २३ केंद्रांवर करण्यात आले होते. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मूल्यांकनाची व्यवस्था विद्यापीठातील परीक्षा भवन आणि धारशिव येथील विद्यापीठाच्या उपपरिसरात केली असल्याचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी कळविले आहे.
असा लागला तृतीय वर्षाचा निकालबी.एस्सी.च्या तृतीय वर्षाला एकूण १८ हजार ६८३ विद्यार्थी बसले होते. त्यातील १७ हजार २५९ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे. त्यात १० हजार ८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ५८.०१ टक्के एवढी असून, नापासांची टक्केवारी ४१.९९ एवढी आहे. बी.कॉम.च्या तृतीय वर्षाला ९ हजार ३१ विद्यार्थी बसले होते. ८ हजार ३७८ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. त्यातील ६ हजार ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ६६.८८ एवढी आहे. बी.ए.च्या तृतीय वर्षाला ११ हजार १४२ विद्यार्थी बसले होते. त्यातील ९ हजार ८२८ विद्यार्थ्यांचा निकाल घोषित केले. त्यात ६ हजार ३९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.३५ टक्के एवढी आहे.