वडोदबाजार : बहिणीला नेण्यासाठी आलेल्या भावाला भरधाव एसटीने उडविल्याने या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघातऔरंगाबाद-सिल्लोड महामार्गावरील खामगाव फाट्याजवळ बुधवारी सकाळी झाला. परसराम पंढरीनाथ चिकटे (१९, रा. नांजा, ता. भोकरदन, जि. जालना), असे मयत युवकाचे नाव आहे. मृत युवकाचे सैन्यात जाण्याचे स्वप्न अपूर्णच राहिल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
परसराम बुधवारी सकाळी फुलंब्री तालुक्यातील चौका येथे त्याच्या बहिणीला आणण्यासाठी जात होता. खामगाव फाट्याजवळ औरंगाबादहून जळगावकडे जाणाऱ्या भरधाव बसने (एमएच-२० बीएल ३९६३) परसरामच्या दुचाकीला (एमएच-२१ बी एन ५७६४) समोरून जोरदार धडक दिली. नागरिकांनी त्यास फुलंब्री येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या अपघाताची नोंद वडोदबाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली.
सैन्यात रुजू होण्याचे स्वप्न राहिले अपूर्णमृत परसराम चिकटे या युवकाची काही दिवसांपूर्वीच लष्करात भरती होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. चांगल्या गुणांनी तो परीक्षा उत्तीर्णही झाला होता. कागदपत्र पडताळणी व ट्रेनिंगसाठी काही दिवसांनंतर तो जाणार होता. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे भरतीची पुढील प्रक्रिया रखडली होती. त्यातच या अपघातात त्याच्यावर काळाने झडप घातल्याने त्याचे सैन्यात रुजू होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.