तज्ज्ञांचा सल्ला : वय, वजन आणि आजाराच्या स्वरूपानुसार पाणी पिणे गरजेचे
औरंगाबाद : पाणी म्हणजे जीवन, हे आपण शाळेपासून शिकत आलो आहोत आणि ते अगदीच खरे आहे. पाणी म्हणजे आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक होय. निरोगी शरीरासाठी २४ तासात तीन ते साडेतीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच प्रोस्टेड, हृदयरोग, मुत्रपिंडाचा आजाराच्या रुग्णांनीदेखील योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. कारण गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेदेखील धोकादायक ठरू शकते. वय, वजन आणि आजाराच्या स्वरूपानुसार पाणी पिणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात ६० टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते; मात्र काही लोक प्रमाणाबाहेर पाणी पितात. अनेक जण एकाच वेळी दोन ते तीन ग्लास पाणी पितात. ही बाब शरीरासाठी फायद्याची ठरण्याऐवजी नुकसानदायक ठरण्याची भीती असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या प्रकृतीनुसार, वयानुसार, वजनानुसार आणि आजारांच्या स्थितीनुसार योग्य प्रमाणात पाणी पिले पाहिजे.
शरीरात पाणी कमी पडले तर...
पाणी कमी प्रमाणात पिले तर मुतखडा होण्याची शक्यता वाढते. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यावर डिहाइड्रेशन होऊ शकते. व्यक्तीला खूप थकवा जाणवतो. थोडी मेहनत केल्यावरही लगेच थकवा जाणवतो. पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा शरीरात कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होते.
-------
शरीरात पाणी जास्त झाले तर...
गरजेपेक्षा अधिक पाणी पिल्यास वारंवार लघवीला जाण्याचा त्रास सहन करावा लागतो. व्यक्तीची झोप बिघडते. त्याबरोबर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी-अधिक होते. ----
कोणी किती प्यावे पाणी?
१५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी दिवसभरात साधारण एक लिटर पाणी पिले पाहिजे. तर मोठ्या व्यक्तींनी साधारण तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यावे. हृदयविकार, मुत्रपिंड विकाराच्या रुग्णांनी २४ तासांत दीड ते दोन लिटर पाणी प्यावे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
------
६० वर्षांनंतर पाणी कमी प्यावे
मोठ्या व्यक्तींनी, तरुणांनी आणि ज्यांना काही आजार नाही अशांनी २४ तासांत तीन ते साडेतीन लिटर पाणी पिले पाहिजे. इतके पाणी पिल्याने मुतखडा होण्याची शक्यता कमी होते. बारीक कण लघवीवाटे निघून जातात. वय वाढल्यानंतर म्हणजे वयाच्या ५० ते ६० वर्षांनंतर पाणी पिणे कमी करावे.
-डाॅ. अभय महाजन, युरोलाॅजिस्ट.
---
२ ते ३ लिटर पाणी पिणे पुरेसे
वय, वजन आणि आजाराचे स्वरूप यावर एखाद्याने किती पाणी प्यावे, हे अवलंबून आहे. कोणाला पाणी कमी पडते, कुणाला जास्त होते; परंतु २ ते ३ लिटर पाणी पिणे पुरेसे ठरते. हृदयविकाराच्या रुग्णांनी पाणी कमी पिले पाहिजे. ज्यांना कोणताही त्रास नाही, अशांनी पुरेशा प्रमाणात पाणी पिले पाहिजे.
- देवदत्त पळणीटकर, युरोलाॅजिस्ट.