औरंगाबाद : मराठवाड्यातील ४ महापालिका, ५० नगरपालिका आणि २५ नगरपंचायतींपैकी बहुतांश शहरे तहानली आहेत. मराठवाड्यातील ३३ शहरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई असून, त्या शहरांना पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. मराठवाड्यातील शहरी भागांतील पाणीटंचाई अनुषंगाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आढावा बैठक घेतली. पाणीटंचाईबाबत प्रशासनाने संवेदनशील राहावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. बैठकीला नगरपालिका विभागाचे प्रादेशिक उपसंचालक शिवाजी शिंदे, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
विभागातील १३ शहरांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्प कोरडे पडल्यामुळे तेथे भीषण पाणीटंचाई आहे, तर मे महिन्याअखेरपर्यंत पुरेल इतकेच पाणी शिल्लक असलेल्या २० शहरांत तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक शहरांना दहा ते बारा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे असलेल्या औरंगाबाद शहराची जीवनरेखा असलेले जायकवाडी धरण मृतसाठ्यात गेले आहे. धरणात पाणी असले तरी औरंगाबाद शहराला आठ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होतो आहे. नगरपालिका, नगर पंचायतींना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेवराई नगरपालिकेने पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे जायकवाडी धरणातील पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. विभागातील ७९ शहरांपैकी बहुतांश शहरी भागांतील नागरिकांना खाजगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
ही १३ शहरे टँकरवरऔरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, फुलंब्री, वैजापूर शहरांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे टँकरशिवाय पाणीपुरवठ्याचा पर्याय शिल्लक नाही. जालना जिल्ह्यातील भोकरदन व घनसावंगी, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, नांदेड जिल्ह्यातील उमरी व किनवट, बीड जिल्ह्यातील वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, लातूर जिल्ह्यातील औसा अशा १३ शहरांना पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या प्रकल्पांतील पाणी संपल्यामुळे त्या शहरांची तहान टँकरने भागविण्यात येत आहे.
२० शहरांना मे अखेरपर्यंत पाणी पुरेलसिल्लोड, कन्नड, बदनापूर, पाल, सोनपेठ, गंगाखेड, कंधार, धर्माबाद, बिलोली, लोहा, हदगाव, मुखेड, मुदखेड, हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर, बीड, रेणापूर व लोहारा बु. या २० शहरांना पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पांत मे अखेरपर्यंत पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. यातील निम्म्या शहरांना १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे.
सिल्लोडला ५८ कि़मी.हून पाणीऔरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड आणि वैजापूर शहरात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. सिल्लोडला पाणीपुरवठा करणा-या खेळणा प्रकल्पाने एप्रिल अखेरपर्यंत तहान भागविली. आता प्रकल्प तळाला गेला आहे, त्यामुळे पाणीटंचाईच्या अनुषंगाने ५८ किलोमीटर लांब असलेल्या केळगाव-खडकपूर्णा प्रकल्पातून टँकरद्वारे पाणी आणण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. दरम्यान, सिल्लोड, भोकरदन आणि जाफ्राबाद शहरांसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी आणण्याची योजना अपूर्ण स्थितीमध्ये आहे. योजना पूर्ण झाली असती तर या तिन्ही शहरांना सध्याच्या दुष्काळात दिलासा मिळाला असता. योजनेचे जाफ्राबादपर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. तेथून भोकरदन व सिल्लोडसाठी पाणी आणण्याबाबतही निर्णय होणे शक्य आहे.