छत्रपती संभाजीनगर : शहरातील कांचनवाडीतील एका आलिशान बंगल्यातून व पैठण एमआयडीसीतील एका कंपनीतून गुजरात पोलिस, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकांनी तब्बल २५० कोटी रुपयांचे ४४ किलो कोकेन, मेफेड्रोन आणि केटामाईन ड्रग्ज साठा पकडला. वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये छापा टाकला असून तेथे अमली पदार्थ तयार करण्यासाठीचे २५०ते ३०० कोटीहून अधिक किमतीचे कच्चे रसायन असल्याचा अंदाज पथकाने व्यक्त केला. गुजरातेतून आलेले हे पथक गेले दोन दिवस (दि.२० व २१ ऑक्टोबर) अतिशय गोपनीय पद्धतीने शहरात छापे टाकत असताना शहर पोलिसांना त्याची किंचितही माहिती नव्हती. अहमदाबाद, मुंबई आणि पुणे येथील पथकांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविल्यानंतर दोन आरोपींना अटक केली आहे. त्यातील एका आरोपीने येथील जीएसटी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दुसऱ्या आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.
२५० कोटींचे पक्के, २५० ते ३०० कोटींचे कच्चे रसायनगुजरातच्या पथकांनी मारलेल्या छाप्यात २५० कोटी रुपयांचे ४४ किलो अमली पदार्थ पकडण्यात आल्याचे डीआरआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मात्र, पैठण एमआयडीसी आणि वाळूज एमआयडीसीतील २५० ते ३०० कोटीहून अधिक किंमतीचे कच्चे रसायनही आढळले आहे. ते अद्यापही रेकॉर्डवर घेण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा कच्चा माल चार दिवसांमध्ये पक्का होणार असल्याचेही गोपनीय अहवालात म्हटले आहे.