औरंगाबाद: कट रचून मित्रांमार्फत १६ जनावरांचा ट्रक लंपास केल्यानंतर चोरट्यांनी मारहाण करून ट्रक हिसकावून नेल्याची माहिती वाहनमालकाला देणाऱ्या ट्रक चालक आणि वाहकाची बनवेगिरी पोलिसांसमोर टिकली नाही . पोलिसांनी आरोपी चालक आणि वाहकाला अटक केली आणि त्यांच्या साथीदारांनी लिंबेजळगाव शिवारात लपवून ठेवलेली जनावरे आणि ट्र्क जप्त केला असून आरोपींच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे.
ट्रकचालक अमजद अहमद कुरेशी ( रा . बडा तकिया , नुतन कॉलनी) आणि वाहक मंगेश प्रल्हाद पोळ (रा . गवळीपुरा , छावणी) अशी आरोपींची नावे आहेत . याविषयी प्राप्त माहिती अशी की , अब्दीमंडी येथील आसाराम बाबाराव वरकड हे जनावरांचा व्यापार करतात . त्यांनी देवगाव रंगारी येथे १६ गायी आणि गोऱ्हे खरेदी केले होते . ही जनावरे घेऊन येण्याचे काम ट्रकमालक अब्दुल अमीन मोहम्मद खाजामिया यांना दिले होते . याकरिता ट्रक भाडे ही ठरले होते . अमीन यांचा ट्र्कचालक अमजद आणि क्लिनर मंगेश यांनी ३ जुलै रोजी रात्री जनावरे ट्र्कमध्ये भरली आणि ते दौलताबादकडे येत असतांना दिवशी पिंपळगाव फाट्याजवळ दुचाकीस्वार तीन जणांनी ट्रकसमोर दुचाकी आडवी लावून मारहाण करून जनावरासह ट्रक नेल्याची माहिती सकाळी ६ वाजता ट्रकमालक यांना कळविली . यानंतर अब्दुल अमीन यांनी सिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली . या घटनेची माहिती मिळताच स्थागुशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे , उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत , कर्मचारी विठ्ठल राख , नवनाथ कोल्हे आणि कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेऊन चालक आणि क्लीनरची स्वतंत्र चौकशी केली. तेंव्हा ते वेगवेगळी माहिती आणि घटना सांगू लागले . पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावल्याने त्यांना खाक्या दाखविताच क्लीनर मंगेशने गुंह्याची कबुली देत त्याचा साथीदार सचिन तायडे याच्या सांगण्यावरून हा ट्रक त्याने आणलेल्या तीन जणांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले .
२० हजाराच्या आमिषाला पडले बळीआरोपी सचिन तायडे याने ट्रक चालक आणि क्लीनर यांना प्रत्येकी २० हजार रुपये देण्याचे कबुल केले होते. २० हजाराच्या आमिषाला बळी पडून त्यांनी साडेचार लाखाची जनावरे आणि ११ लाखाचा ट्रक चोरांच्या स्वाधिन केल्याचे निष्पन्न झाले .
लिंबेजळगाव शिवारातून जनावरांसह ट्रक जप्त गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू करताच लिंबेजळगाव शिवारातील शेतात चोरट्याने जनावरे भरुन ट्रक आणून ठेवल्याची माहिती मिळाली . पोलिसांनी लगेच तेथे जाऊन पहानी केली असता आरोपीनी पळविलेला ट्रक आणि पशूधन असल्याचे स्पष्ट झाले . जनावरे आणि ट्रक जप्त केला .