ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद: महामार्गावरील मद्यालये बंद झाल्याने मद्यपींची चांगलीच गोची झाली आहे. मद्य तस्करांना मात्र यामुळे पैसे कमविण्याची ही एक संधीच मिळाली. जालना रोडवरील एका हॉटेलमधील ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार मद्य विक्री करणा-यास हॉटेलचालकास चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. " बार ऑन व्हील " असलेल्या कारमध्ये लपवून ठेवलेला ५ हजार ६०० रुपयांचा दारूसाठा आणि १ लाख ९० हजाराची कार पोलिसांनी जप्त केली.
शशांक वैजीनाथ कदम (३१,रा. बीड बायपास परिसर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले म्हणाले की, जालना रोडवरील हॉटेल लोकसेवा येथे ग्राहकांना अवैध दारू विक्री केली जात असल्याची माहिती खब-याने पोलिसांना दिली. यानंतर आम्ही दोन पंटर ग्राहक हॉटेलवर पाठवून त्यांना मद्य मागण्याचे सांगितले असता आरोपी शशांक हा हॉटेलच्या काऊंटरवर बसलेला होता. यावेळी त्याने विदेशी मद्याची बाटली त्याच्या कारमधून (क्रमांक एमएच-२१ -२१९२)आणून दिली.
यानंतर पोलिसांनी त्यास पकडले आणि हॉटेलची झडती घेतली असता तेथे विदेशी मद्याच्या १२ बाटल्या मिळाल्या. यासोबतच हॉटेलच्या परिसरात उभ्या कारची झडती घेतली असता कारमध्येही दारूच्या आणखी ८ बाटल्या मिळाल्या. हा दारूसाठा आणि " बार ऑन व्हील" असलेली कार पोलिसांनी जप्त केल्या. आरोपीविरूद्ध चिकलठाणा ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके आणि कर्मच-यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.