औरंगाबाद: ऑनलाइन जुगारात काही दिवसांत अडिच लाख रुपये हरल्याचा धक्का बसल्याने वाहनचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पळशी येथे मंगळवारी सकाळी समोर आली. राजेश सुभाष साहु (३०,मूळ रा. खंडवा,नर्मदानगर, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. याविषयी चिकलठाणा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, राजेश हे गेल्या दोन वर्षापासून समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे वाहनचालक म्हणून नोकरीला होते. पळशी येथे ते किरायाने खोली घेऊन पत्नीसह राहात होते. दोन ते तीन महिन्यापासून ते कामावरून परतल्यानंतर रोज रात्री घराच्या गच्चीवर बसून मोबाइलवर ऑनलाइन जुगार खेळत. या जुगारात ते कधी पैसे जिंकत तर कधी हरत असत. महिनाभरात ते जुगारात अडिच लाख रुपये हरले होते. ही बाब त्यांनी त्यांची पत्नी आणि सहकामगारांना सांगितली होती.
सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे कामावरून परतल्यावर ते जेवण केल्यावर मोबाइल घेऊन गच्चीवर जाऊन बसले. बराचवेळ पत्नी त्यांना बोलवण्यास गेली. तेव्हा तुम्ही झोपा मी येतो,असे ते म्हणाले. यामुळे त्यांची पत्नी घरात जाऊन झोपली. यानंतर राजेशने जिन्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. मंगळवारी सकाळी त्यांची पत्नी झोपेतून उठली तेव्हा त्यांना हा प्रकार दिसला. ही माहिती चिकलठाणा पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस हवालदार अजीत शेकडे तपास करीत आहेत.