छत्रपती संभाजीनगर : वाहनचालकांना ३ वर्षांपूर्वी म्हणजे २०२१ मध्ये मुदत संपलेले ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने लायसन्सच्या प्रतीक्षेत असलेल्या वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाहनधारकांना देण्यात येणाऱ्या लायसन्समध्ये काही दिवसांपूर्वीच बदल करण्यात आला. देशभरात एकाच प्रकारचे लायसन्स देण्यावर भर दिला जात आहे. पूर्वीच्या लायसन्सवर चीप असे. परंतु नव्याने देण्यात येणाऱ्या लायसन्समध्ये ही चीप नाही. एका एजन्सीच्या माध्यमातून लायसन्सचे प्रिंटिंग आणि वितरणाचे काम केले जात आहे. चाचणी दिल्यानंतर आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया केल्यानंतर वाहनचालकांना पोस्टाने घरपोच लायसन्स दिले जाते. लायसन्स हाती पडल्यानंतर काही वाहनचालकांना काहीसा धक्काच बसत आहे. कारण लायसन्स वितरण केल्याची (इश्शू डेट) तारीख आणि वर्ष हे २०२४ मधील आहे. परंतु लायसन्सची मुदत चक्क २०२१ मधील नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे लायसन्स कसे चालणार? असा प्रश्न घेऊन वाहनचालक आरटीओत चकरा मारत आहेत. लायसन्स दुरुस्त करून मिळणार की पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार, अशी विचारणा वाहनचालकांकडून होत आहे.
‘एनआयसी’ ला विचारणाहा साॅफ्टवेअर मधील दोष दिसतो. यासंदर्भात ‘एनआयसी’ ला विचारणा करण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.