सिल्लोड( औरंगाबाद ) : भराडी रस्त्यावरील वाडी फाट्याजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या लोकांना दरोडेखोर समजून उडवून दिल्या प्रकरणात जीप चालकास सिल्लोड शहर पोलिसांनी वाहनासह २४ तासाच्या आत अटक केली. या अपघातात तिघांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाले होते. शेख जाहेद मोहम्मद अनिस ( 20, रा.अजिंठा ) असे चालकाचे नाव आहे.
सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे यांनी तापासचक्र गतिमान करीत २४ तासाच्या आत अपघातास कारणीभूत असलेल्या क्रूझर जीपचा शोध लावला. शनिवारी मध्यरात्री झालेल्या या अपघात ३ जण ठार झाले होते तर सहा जण गंभीर जखमी झाले होते. शहर पोलिसांनी सिल्लोड शहर, भराडी, पिशोर येथील सिसिटीव्ही फुटेज तपासले. यात शहरातील अर्जुन हॉटेल येथील सिसिटीव्ही फुटेजमध्ये एक क्रूझर जीप रात्री भराडीच्या दिशेने जातांना दिसली. अधिक तपास केला असता अपघातातील जीप अजिंठा येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ अजिंठा गाठून आरोपी शेख जाहेद मोहम्मद अनिस यास जीपसह ( एम.एच. 20 डीबी 7286 ) ताब्यात घेतले.चालक शेख जाहेद मोहम्मद अनिस यांनी पोलिसांना दिल्या जवाबात सांगितले की, शनिवारी रात्री प्रवासी घेऊन जात असताना वाडी फाट्याजवळ रस्त्यावर समोरून येणाऱ्या ट्रकच्या लाईटमुळे रोडवर उभी असलेली माणसे दिसली नाही. त्यांना उडवून अंभईमार्गे अजिंठा येथे निघून गेलो. पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे.
वाद सोडविणे बेतले मजुरांच्या जिवावरसिल्लोड-भराडी रस्त्यावरील वाडी फाट्याजवळ रस्त्याच्या मधोमध दोन दुचाकीस्वार भांडण करीत असताना ते सोडविण्यासाठी काही जण थांबले होते. समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने त्यांना दरोडेखोर समजून उडवून दिले होते. यात भांडण करणाऱ्या एकासह ते सोडविणारे दोघे अशा तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात केवळ रस्त्यावर होत असलेला वाद सोडविण्यासाठी ट्रकमधून खाली उतरलेल्या शेख नईम, शेख हमीद या दोघा मजुरांचा नाहक मृत्यू झाला. तर दुचाकीवर जाणाऱ्या गुलामनबी यांचाही या अपघातात मृत्यू झाला. शेख नईम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, आई, वडील, सहा भाऊ, बहीण असा परिवार आहे. शेख हमीद यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, सहा भाऊ, तर गुलामनबी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.