औरंगाबाद : फिटनेस तपासणीत ट्रकची चाचणी घेताना कॅबिनचे लॉक तुटल्याने झालेल्या विचित्र अपघातात वाहन निरीक्षकासह चालक जखमी झाला. ही घटना मंगळवारी करोडी शिवारातील प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात घडली.
नारायण पोपट जिवरग (रा. औराळा, जि. औरंगाबाद) हा चालक फिटनेस तपासणीसाठी ट्रक (एमचए-२० सीटी-३९०५) घेऊन मंगळवारी करोडीतील आरटीओ आॅफिसमध्ये आला होता. वाहन निरीक्षक नीलेश लोखंडे हे ट्रकची चाचणी घेत होते. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी ब्रेक दाबताच ट्रकच्या कॅबिनचे लॉक तुटले. त्यामुळे कॅबिनचा पूर्ण भाग समोर आदळला गेला. यात लोखंडे यांच्या डोक्याला झाली आहे. जिवरग हेही जखमी झाले. लोखंडे यांना खाजगी दवाखान्यात नेले. घटनेनंतर ट्रकचे कॅबिन दुरुस्ती करण्यात आली.
मोठा अनर्थ टळलाट्रकची कॅबिन जमिनीवर आदळताच वाहन निरीक्षक लोखंडे यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; पण दोन्ही पाय स्टेरिंगमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर येणे शक्य नव्हते. चालकही आतमध्ये अडकला होता. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या वाहन निरीक्षक लोखंडे व चालक जिवरग यांना सुखरूप बाहेर काढले. प्रसंगावधान राखत लोखंडे यांनी ब्रेक दाबून ठेवल्याने व अधिकाऱ्यांनी ट्रक बंद करून वेळेत बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.