कनेरगाव नाका : येथील मुख्य राज्य रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर वाहने उभी करीत आहेत. तासन्तास वाहने उभी करून जोर-जोराने गाणे लावत असल्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देवून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव येथील मुख्य राज्य रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या भरमसाठ आहे. चालकांकडून ही वाहने येथील छोटे-मोठे लघु उद्योग करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर उभी केली जात आहेत. प्रवाशी भरेपर्यंत ही वाहने उभा करून व्यापाऱ्यांना अडचण निर्माण केली जात आहे. शिवाय वाहनात बसून मोठ्या आवाजात गाणे लावली जात आहेत. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांना संवाद साधतेवेळी अडचण होत आहे. मागील अनेक महिन्यांपासून येथील लघु उद्योग चालकांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय परिसरातील सर्वाजनिक शांततेचा भंग देखील होत आहे. ग्रामस्थ देखील या वाहनचालकांना कंटाळली आहेत. मुख्य राज्य रस्त्यावर वाहन उभे असल्याने ये-जा करणाऱ्यांना अधिक त्रास होत आहे. प्रामुख्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांसह व्यापारी देखील या अवैैध वाहतूक करणाऱ्यांना कंटाळली आहेत. व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहेत. शिवाय सामाजिक शांतता देखील भंग होत आहे. त्यामुळे कनेरगाव पोलिस चौकीच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी लक्ष देवून अवैध वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
कनेरगावातील व्यापाऱ्यांना वाहनचालकांचा त्रास
By admin | Published: July 16, 2014 11:53 PM