- दिलीप मिसाळ, गल्लेबोरगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद
आॅक्टोबरदरम्यानचा काळ हा शेतीसाठी संक्रमणाचा मानला जातो. खरीप हंगाम संपत आलेला असतो आणि रबीच्या तयारीला नुकतीच सुरुवात होते; पण यंदा हे चक्र उलटे फिरण्याची भीती आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे, तो मान्सून. यंदा पावसाने जी काही असमानता दाखविली, तीच आगामी काळातील दुष्काळाची चाहूल देणारी ठरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटांना तोंड देत आहे. ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’ अशी गत यंदा शेतकऱ्यांची झाली आहे.
खरिपातील पिकांची काढणी, मळणी आणि विक्रीची कामे आॅक्टोबरदरम्यान सुरू असतात, तर रबीसाठी मशागत, पेरणी या कामांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असते; पण यंदा मात्र हे सगळेच ठप्प झाले आहे. यंदा पाऊस बरसलाच नाही. जून कोरडा गेला. त्यानंतर जुलैमध्ये महिनाभर थोडा पाऊस झाला; पण पिकांचे काय, असा प्रश्न पडला आहे. कारण, नंतर पावसाने जी दडी मारली ती शेवटपर्यंत कायम राहिली. परतीच्या काळात अनेक वेळा पाऊस दिलासा देऊन जातो. मात्र, यंदा हे भाग्य लाभलेच नाही.
खरिपाचे पीक चांगले आले की, पुढील वर्षभराचे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित व्यवस्थित बसते. यंदा पावसाने जी उघडीप दिली, त्यामुळे पिके करपून गेली. त्यातच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या वर्षीची कपाशी, मका पिकाची विक्रमी आकडेवारी पाहता यंदा त्यापेक्षा जास्त उत्पादन होईल, असे वाटत होते; परंतु निराशा झाली. पिके करपली आहेत. पिण्यासाठीच पाणी नाही, तर शेतीला कोठून देणार, अशी स्थिती आहे. कपाशीवरील बोंडअळीने शेतकऱ्यांचे आधीच कंबरडे मोडलेले असताना आणि यावर्षी उसनवारी व सावकाराकडून कर्ज घेऊन पिके उभी केली. पण हाती काहीच पडणार नाही.
कृषी विभागामार्फत पिकांची पाहणी करून विनाविलंब पंचनामे करणे गरजेचे आहे. तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये सरासरी २५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडलेला असून, तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठीदेखील चारा व पाणी विकत आणावे लागत आहे. हाताशी आलेला मका, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, कपाशीची पाते गळून पडत असल्याने उत्पन्न घटत आहे. गल्लेबोरगाव परिसरात मक्याच्या पिकाची काढणी जोरात सुरू असून, सध्या मका काढणीसाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करता शेतकऱ्यांची गत ‘लाखाचे बारा हजार’ यासारखी होऊन बसली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले जाते.
एका वेचणीतच पीक संपुष्टात येणारगल्लेबोरगाव परिसरातील प्रमुख पिके कापूस, मका, बाजरी ही असून, यंदा पाऊस नसल्याने ही पिके सुकल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कापसाच्या एका झाडास केवळ १२ ते १३ बोंडे आली आहेत. यावर्षी एका वेचणीतच कापूस पीक संपुष्टात येणार आहे. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. उत्पादनात मोठी घट झाली आहे. पावसाचा खंड पडल्याने पिकांची वाढ झाली नाही.-विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी
बळीराजा काय म्हणतो?- माझ्या शेतात मी मोसंबी लावलेली असून मागील वर्षी ही बाग वाचवण्यासाठी टँकरचे विकतचे पाणी घातले व बाग वाचवली. यावर्षी शेततळे केले, दोन लाख खर्च करुन ताडपत्री टाकली पण पाऊसच नसल्यामुळे हे पैसे वाया जाणार आहे. मोसंबी बाग वाचवायची कशी, अशी चिंता लागली आहे. कृषी विभागाकडून माझे अनुदान देखील अजून मिळाले नाही. -विलास सुरासे
- आॅक्टोबरमध्येच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. पैशाची चणचण आहे. शासनाने चारा छावणी सुरु केली पाहिजे, तरच गुरे जगतील. -पोपट बोडखे
- या भागातील शेतकरी आर्थिक संकटात आहेत. परतीचा पाऊस न आल्याने रबीची पेरणी करता येईना. सध्या परिस्थिती अवघड झाल्याने उरात धडकी भरली आहे. -बाळासाहेब आहेर
- पाऊस कमी झाल्याने मका, कपाशी, तूर, अद्रक ही पिके करपून वाया गेली. आता पाणीटंचाई भासत असल्याने रबीचा विचार न केलेला बरा. -सुदाम बोडखे