छत्रपती संभाजीनगर : आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला कळताच सर्वात अगोदर वेगवान पद्धतीने घटनास्थळी पोहोचण्याचे काम आता ड्रोन करणार आहे. ड्रोनद्वारे घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यावर तिथे अतिरिक्त पाण्याचे बंब, यंत्रसामग्री पाठविण्याचे नियोजन करणे अग्निशमन दलाला शक्य होईल. राज्यात मुंबईनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकाच अशा पद्धतीचा उपक्रम राबवित आहे. लवकरच अग्निशमन दलाच्या ताफ्यात तब्बल पाच ड्रोन दाखल होणार आहेत.
मराठवाड्यातील आपत्कालीन व्यवस्थेची जबाबदारी महापालिकेच्या अग्निशमन दलावर आहे. मागील काही दशकांमध्ये अग्निशमन दल ज्या पद्धतीने सक्षम करायला हवे होते तसे करण्यात आलेले नाही. उंच इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक लॅडर, शिडी नाही. शहरात एकापेक्षा अधिक व्हीव्हीआयपी आल्यानंतर त्यांच्या सुरक्षा ताफ्यात अग्निशमन दलाचा बंब पाठविल्यास संपूर्ण शहरासाठी एकच बंब शिल्लक राहतो. अग्निशमन विभागात निवृत्तीनंतरचे प्रमुख अधिकारी नेमले आहेत. कायमस्वरूपी कर्मचारी कमी आणि कंत्राटी अधिक अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेतला असून, अग्निशमन विभाग अधिक सक्षम कसा करता येईल यावर भर दिल्या जात आहे. २०२३-२४ वर्षाच्या अर्थसंकल्पात अत्याधुनिक वाहन खरेदीसाठीही आर्थिक तरतूद करण्यात आली. त्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणीची गरज आहे.
वर्षभरात किती आगीच्या घटना?शहर आणि आसपासच्या परिसरात वर्षभरातून ८०० ते १००० आगीच्या घटना घडतात. त्यामध्ये कोट्यवधींची मालमत्ता जळून खाक होते. काही ठिकाणी तर मनुष्यहानीही होते. मनपा अग्निशमन विभाग या आगींवर नियंत्रण मिळविते. या शिवाय एमआयडीसीचे स्वतंत्र अग्निशमन विभागही शहरात आहे. आग मोठी असल्यास मनपाही त्यांच्या मदतीला धावते.
अशी आहे, ड्रोनची संकल्पनाआग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी ड्रोन पाठविण्यात येईल. अग्निशमन किंवा स्मार्ट सिटी कंट्रोल रूमला आगीचे स्वरूप त्वरित लक्षात येईल. पहिली गाडी पाठविल्यानंतर आणखी किती गाड्या लागतील हे दुसऱ्या मिनिटाला निश्चित होईल. तेथे कोण-कोणते साहित्य लागेल हेसुद्धा लक्षात येणार आहे. त्यामुळे कमी वेळेत नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न होतील.
पाच ड्रोनची खरेदीमुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अशा पद्धतीचा उपक्रम राबविण्यात येतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत पाच ड्रोनची खरेदी छत्रपती संभाजीनगर महापालिका करीत आहे.