लासूर स्टेशन ( वैजापूर ) : वर्षाकाठी जवळपास ३ लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या मोसंबीच्या बागेला वाचविण्यासाठी यंदा विकतही पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हतबल झालेल्या शिरेगाव येथील शेतकऱ्याने तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेल्या ३०० मोसंबीच्या झाडांवर चक्क करवत चालवली. दुष्काळामुळे परिसरात आताच पाण्याचे सर्व स्रोत कोरडेठाक पडल्याने आगामी काळात भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, हे निश्चित आहे.
लासूर स्टेशनसह परिसरातील गावांना दुष्काळ जणू पाचविलाच पुजला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे परिसरात एका प्रकारे दुष्काळवाडाच झाला आहे. सध्या हिवाळा सुरू असला तरी आता पाणीटंचाईचे चटके बसत असून, जनावरांच्या पाण्याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. त्यात पीकही जगविणे अवघड झाल्याने हतबल झालेल्या शिरेगाव येथील शेतकरी अनिल क-हाळे या तरुण शेतकऱ्यावर दीड एकर क्षेत्रावरील जवळपास ३०० मोसंबीची झाडे तोडण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे सुरुवातीला दोन ते तीन वर्षेमोसंबी विक्रीतून या शेतकऱ्याला वर्षाकाठी ३ ते ४ लाख रुपये उत्पन्न झाले होते; मात्र दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत गेल्यामुळे हळूहळू त्यांना उत्पादनात फटका बसू लागला; मात्र यावर्षी बाग ऐन भरात असताना पावसाने दगा दिला. यानंतर कशीबशी विकतच्या पाण्यावर बाग जगविण्याचा प्रयत्न केला; मात्र परिसरात शेतीसाठी विकतही पाणी मिळत नसल्याने अखेर हतबल झालेल्या या शेतकऱ्याने ३०० मोसंबीच्या झाडांवर करवत चालविली.