औरंगाबाद : राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळ परिस्थिती आहे. या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पिण्याचे पाणी पुरविणे, चारा छावण्या सुरु करणे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी मी पंतप्रधानांना भेटलो असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुलंब्री येथील कार्यक्रमात दिली.
फुलंब्री येथे बारा कोटी रुपये खर्चाच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते आज दुपारी करण्यात आले. याशिवाय शासकीय विश्रामगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, फुलंब्री पोलीस ठाण्याची इमारत, कान्होरी रस्त्यावरील दोन पुलांचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलतांना म्हणाले; राज्य सरकारने सेवा हक्क नियम लागू केला. यात संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. यात राज्यभरातून ६ कोटी लोकांचे अर्ज प्राप्त झाले असून यातील ९८ टक्के अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित दोन टक्के अर्जावर ज्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी निभावली नाही, त्यांना शिक्षा भोगावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
हरिभाऊ बागडे यांनी प्रास्ताविकात ग्रामीण भागात करण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. येणाऱ्या काळात आणखी विविध विकास कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, असे सांगितले.
कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी मंत्री डॉ. नामदेवराव गाडेकर, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, तहसीलदार संगीता चव्हाण,जि.प. सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल, अनुराधा चव्हाण, सभापती सर्जेराव मेटे, नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, उपनगराध्यक्ष इंदूबाई मिसाळ, डॉ. सारंग गाडेकर, कैलास गव्हाड, सोमीनाथ कोलते, नरेंद्र देशमुख, गजानन नागरे, जफर चिस्ती, योगेश मिसाळ, मयूर कोलते, बाळासाहेब तांदळे, राजेंद्र डकले, रोशन अवसरमल, अरुण वाहाटुळे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.