सिल्लोड: दुष्काळ सदृश्य स्थिती नव्हे तर सिल्लोड तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावी, या मागणीसाठी आज दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. विशेष म्हणजे, बैलगाडीस कणसे नसलेले मकाचे धांडे, कापसाचे झाडे लावून काढलेल्या या मोर्चाचे नेतृत्व अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा उनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.
मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने बैलगाडी, ट्रक्टरच्या माध्यमातून दुष्काळाची दाहकता दाखवून दिली. दरम्यान, मोर्चाचे नंतर सभेत रूपांतर झाले. यावेळी उनगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले, शासनाने सिल्लोड तालुक्यातील सात महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर केली त्याबद्दल शासनाचे आभार, हा मोर्चा सरकारच्या विरोधात नसून सरकारला परिस्थिती निदर्शनास आणून देण्यासाठी काढण्यात आला आहे. सिल्लोड तालुक्यातील पाणी तापी खोऱ्यात वाहून जाते यामुळे तालुक्याला दुष्काळाच्या झळा जास्त सहन कराव्या लागतात.सिल्लोड तालुका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो.अशा परिस्थितीत शासनाची विशेष मदत नेहमीच गरजेची असते. यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहनही उनगराध्यक्ष अब्दुल यांनी केले.
मोर्चात जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, नगराध्यक्षा राजश्री निकम, माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, न.प.तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, तालुकाप्रमुख दीपाली भवर, शहरप्रमुख मनोज झंवर, अशोक सूर्यवंशी, राजेंद्र ठोंबरे,युवासेना जिल्हा सचिव शेख इमरान ( गुड्डू ), सयाजी वाघ, सतीश ताठे, नगरसेवक शंकरराव खांडवे, आसिफ बागवान,रऊफ बागवान, अकिल वसईकर, रईस मुजावर,शेख बाबर, मतीन देशमुख, बबलू पठाण, अकिल देशमुख राजुमिया देशमुख यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा सहभाग होता.