- विकास राऊत
औरंगाबाद/पुणे : राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, पाणी आणि चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, दोनच जिल्ह्यात महसूल विभागाकडून चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. पाच जिल्ह्यांत सुमारे दोन लाख पशुधनाची चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठवाड्यात मार्च महिन्यातच २ हजार पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत. औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांना दुष्काळाच्या सर्वाधिक झळा बसत आहेत.
मराठवाड्यातील प्रकल्पात ४ टक्के पाणीसाठा आहे. ८,५५० पैकी १,४५५ गावे व ५०१ वाड्या पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. पुढील तीन महिन्यांत टँकरवर १०० कोटींवर खर्च अपेक्षित आहे. मराठवाड्यात २,३५० कोटींतून २०१५ ते १९ या कालावधीत अंदाजे १ लाख ५९ हजार ५९९ कामे शासकीय अनुदान आणि लोकसहभागातून पूर्ण करण्यात आली. ३५०० गावे जलयुक्त करण्यात आली, असा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, कोट्यवधींचा चुराडा होऊनही दुष्काळ का, असा प्रश्न आहे.
परीक्षा शुल्क माफी नाही२१० तालुक्यांत परीक्षांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, अमरावती विद्यापीठाशी संलग्न पाच जिल्ह्यांत ३८२ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला नाही.
चारा छावण्यांची प्रतीक्षाराज्यात सुमारे ३ कोटी २० लाख ९४ हजार पशुधन आहे. राज्यात एकूण ३६४ पशू छावण्या सुरू आहेत. दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरूवात झालेली असताना अनेक जिल्ह्यांत चारा छावण्या सुरू करण्यास अद्याप मान्यताच मिळालेली नाही.