लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले सैनिक नवनाथ गोरख तिडके हे सुटीवर आले होते. चार दिवसांपूर्वी तो गावातील एका विहिरीवर पोहण्यास गेला, परंतु यामध्येच तो बुडाला. त्याला जवळील मित्र, ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर धारूरच्या खाजगी रूग्णालयात डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी त्याच्यावर उपचार केले. ९ तासानंतर तो शुद्धीवर आला.पिंपरवडा येथील नवनाथ तिडके हा तीन वर्षांपासून भारतीय सैन्यात पालमपूर (हिमाचल प्रदेश) येथे कार्यरत आहे. तो दोन महिन्यांच्या सुटीवर आला आहे. चार दिवसांपूर्वी शेताजवळील विहिरीवर सकाळी दोन मित्रांसह पोहण्यास गेला. त्याने विहिरीत उडी मारल्या नंतर तो वर आलाच नाही. सोबतचे दोन्ही मित्रांनी घाबरून आरडाओरड केली. शेजारील शेतकरी सुनील तिडके, जयदेव तिडके, बाबाराय तिडके, गोरख तिडके यांनी धाव घेत त्याला पाण्यातून बाहेर काढले. छाती दाबून तोंडातून पाणी काढले. त्यांनी तात्काळ धारूरच्या खाजगी रूग्णालयात दाखल केले. येथे डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी उपचार केले. त्यानंतर त्याला लातूरला हलविण्यात आले. सोमवारी त्याला तेथूनही सुटी देऊन घरी पाठविण्यात आले आहे.तिडके म्हणाला, मी भारतीय सैन्यात कार्यरत आहे. मला डॉ. हजारी व ग्रामस्थांमुळे जीवदान मिळाले आहे. मी आता पुढील सर्व जीवन राष्ट्र सेवेला समर्पित करण्याचे निश्चित केले आहे.
पाण्यात बुडालेल्या सैनिकाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:29 AM