औरंगाबाद : गर्भपाताची प्रतिबंधित औषधी बाळगणाऱ्या माळीवाडा येथील सिद्धिविनायक क्लिनिक व औषधी दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी छापा टाकून औषधी जप्त केली. या औषधीची किंमत १२ हजार ७३३ रुपये आहे.
माळीवाड्यात एका दवाखान्यात महिलांना गर्भपाताची औषधी दिली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. सहआयुक्त संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त मिलिंद कोळेश्वरकर व औषधी निरीक्षक वर्षा महाजन यांनी सापळा रचून दुपारी दवाखाना व औषधी दुकानात छाप टाकला. तिथे दुकानात गर्भपाताच्या औषधीचा साठा आढळून आला. पंचनामा करून औषधी जप्त करण्यात आली. हा दवाखाना डॉ. दीपक शांतिलाल जैन हे चालवितात. त्यांच्या पडेगाव येथील निवासस्थानाचीही पथकाने तपासणी केली.