लोकमत आणि औरंगाबाद जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. गोमटेश मार्केट रोडवरील औषधी भवनात सकाळी १० वाजता अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त संजय काळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. संघटनेचे माजी अध्यक्ष स्व. रावसाहेब खेडकर यांचा मुलगा यशवंत खेडकर यांनी सर्वप्रथम रक्तदान करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली. उद्घाटनानंतर हरीष काबरा यांनी रक्तदान करून सर्वांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. राज्यात रक्ताचा तुटवडा असताना लोकमतने ‘रक्ताचं नातं’ जोडत रक्तदानाची मोहीम राज्यभर सुरू केली आहे, याचे कौतुक सहआयुक्त काळे यांनी केले. तसेच या शिबिरासाठी पुढाकार घेतल्याबद्दल केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांनी गौरव केला. त्यांच्याच हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र, एक बॅग, सॅनिटायझरची बाटली, ज्यूस देण्यात आला. असोसिएशनचे मराठवाडा अध्यक्ष शेखर गाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेंद्र टिबडीवाला, दिलीप जैन यांची विशेष उपस्थिती होती.
शिबिर यशस्वीतेसाठी सचिव विनोद लोहाडे, उपाध्यक्ष शैलेंद्र रावत, सहसचिव नितीन दांडगे, सागर पाटील, कोषाध्यक्ष निखिल सारडा, सदस्य शेख रईस, सुनील देशमुख, मनोहर कोरे, बाळू सोनवणे, कपिल टिबडीवाला, प्रकल्प प्रमुख संजय लोढा, नंदू काळे, कल्याण कावरे पाटील, वसंत भराड आदींनी परिश्रम घेतले.
कॅप्शन
लोकमत आणि जिल्हा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे औषधी भवनात आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा गौरव करुन प्रमाणपत्र देताना अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त संजय काळे शेजारी शेखर गाडे, यशवंत खेडकर, विनोद लोहाडे व संघटनेचे सर्व पदाधिकारी.