छत्रपती संभाजीनगर : गाझियाबादच्या दोन औषधीनिर्मिती कंपन्यांद्वारे नियमित औषधांचे अनधिकृत उत्पादन घेऊन नशेसाठी पुरवठा केला जातो. इंदूर, ग्वाल्हेरमधून देशभरातील एमआरच्या मदतीने याचे पुढे ट्रॅव्हल्स एजन्सीच्या मदतीने औषधी व्यावसायिकांना वाटप होत असल्याची धक्कादायक बाब निष्पन्न झाली आहे. यात नाशिकचा औषध व्यावसायिक प्रवीण उमाजी गवळी (३२) व एजंट युसूफ खान महेबूब खान (२८, रा. बायजीपुरा) याला सोमवारी अटक करण्यात आली.
शुक्रवारी कुख्यात गुन्हेगार फैजल तेजाची आई रेशमा अंजुम सय्यद एजाज (४५, रा. किलेअर्क) यास अटक करण्यात आली. तिच्या घरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा साठा आढळून आला. पंधरा दिवसांपूर्वीच ती जामिनावर सुटली होती. चौकशीत तिने सर्व माल युसूफ देत असल्याची कबुली दिली. निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी तत्काळ युसूफला अटक केली. युसूफने त्याला प्रवीणकडून औषधांचा पुरवठा होत असल्याचे सांगताच पथकाने त्याला रविवारी नाशिकमधून अटक केली. सोमवारी न्यायालयाने दोघांची पोलिस कोठडीत रवानगी केली.
पहिले ट्रॅव्हल्सचे कार्यालय सीलशहरातील बहुतांश ट्रॅव्हल्स कंपन्या अवैधरीत्या अमली पदार्थांची वाहतूक करतात. प्रवीणच्या चौकशीत प्रामुख्याने हमसफर ट्रॅव्हल्स कंपनीचे नाव निष्पन्न झाले. मालकाला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावताच महत्त्वाचे रेकॉर्ड असलेले क्रांतीचौकातील मुख्य कार्यालय बंद करण्यात आले. पुरावे नष्ट करू नये यासाठी पोलिसांनी सोमवारी कार्यालय सील केले. अन्य ट्रॅव्हल्स कंपन्याही आता पोलिसांच्या रडारवर आहे.
पहिल्यांदाच कंपन्या ‘ऑन रेकॉर्ड’पोलिसांनी न्यायालयात बाजू मांडताना फेडआरएक्स, रेक्सोडिन या कंपन्यांची कोडेन सीरप औषधांची नशेसाठी विक्री करत असल्याची बाब अधोरेखित केली. त्यांचे स्थानिक, आंतरराज्यीय कर्मचारी, एजंटचा शोध घेऊन रॅकेट उघडकीस आणायचे असल्याचे सांगून पोलिस कोठडीची मागणी केली. शिवाय, प्रवीणच्या एजन्सीचा औषध परवाना रद्द करण्यासाठी नाशिकच्या अन्न व औषधी प्रशासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला.
देशभरात पसरले रॅकेटगाझियाबादमध्ये याचे उत्पादन होत असून, इंदूर, ग्वाल्हेरमधील मोठे एजंट विविध फर्मच्या नावे विक्री करतात. प्रवीण त्यांच्या संपर्कात असतो. मात्र, तो नशेसाठीचा अनधिकृत औषधांचा साठा स्वत:च्या सुयोग फार्माऐवजी दुसऱ्या फर्मच्या नावावर घेतो. गुन्ह्याची व्याप्ती वाढत असल्याने या संपूर्ण रॅकेटचा तपास पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पथकाच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्याकडे सुपुर्द केला. यापूर्वीच्या एकाही कारवाईत स्थानिक पोलिसांनी अपेक्षित तपासच न केल्याने अमली पदार्थांच्या तस्करांवर कुठलाच परिणाम झाला नव्हता.