औरंगाबाद : ऊस, कापसाच्या पिकांत 'गांजा'ची शेती जोमात करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने फुलंब्री तालुक्यातील गणोरी, निधोना शिवारांतील तीन शेतकऱ्यांच्या शेतात छापा मारून तब्बल ६६ लाख रुपयांचा ६५८ किलो गांजा बुधवारी पकडल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी तीन शेतकऱ्यांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक प्रदीप पोटे, भरारी पथकाचे निरीक्षक विजय रोकडे यांना गणोरी व निधोना शिवारांत शेतकरी गांजाचे उत्पन्न घेत असल्याची माहिती मिळाली. अधीक्षक संतोष झगडे यांच्या नेतृत्वात सर्व विभागांच्या निरीक्षकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यात गणोरी शिवारातील रामभाऊ अमृता तांदळे (रा. गणोरी, ता. फुलंब्री) याच्या शेतात गांजाची ४५ झाडे आढळली. या झाडांचे वजन तब्बल ५२० किलो होते. दुसरी कारवाई निधोना शिवारात करण्यात आली. त्या ठिकाणी सुखलाल जंगाळे (रा. निधोना) याच्या शेतात ४० झाडे आढळली. या झाडांचे वजन ५३ किलो भरले; तर तिसरी कारवाई याच शिवारातील कारभारी गुसिंगे याच्या शेतात केली. त्या ठिकाणी गांजाची २२ झाडे आढळली. त्यांचे वजन ७५ किलो एवढे भरले. तिन्ही शेतांत एकूण १०७ झाडांचे एकूण ६४८ किलो वजन भरले. वाळलेला १० किलो गांजाही शेतकऱ्यांकडे आढळून आला. या सर्व गांजाची किंमत ६६ लाख ५ हजार रुपये आहे. तिन्ही आरोपी शेतकऱ्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविल्याचे अधीक्षक झगडे यांनी सांगितले. अधिक तपास निरीक्षक रोकडे करीत आहेत.
अनेक वर्षांपासून गांजाची शेतीएक्साईज विभागाने पकडलेले तिन्ही शेतकरी अनेक वर्षांपासून गांजाची शेती करीत होते. पकडलेला गांजा काढण्याच्या तयारीचा झाला होता. एकाच्या शेतात गांजा काढणी सुरूही होती. झाडांना बोंडे आलेली होती. या बोंडातून निघणाऱ्या द्रवातून चरस हा अमली पदार्थ बनविण्यात येतो.
झाडांची उंची आठ ते दहा फूटएक्साईज विभागाने पकडलेल्या गांजाच्या झाडांची उंची तब्बल आठ ते दहा फूट एवढी होती. ही झाडे दिसू नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या फांद्या मुडपल्या होत्या. त्यामुळे झाडांची उंची दिसून येत नव्हती. तसेच गांजाच्या झाडाची मुळे खोलवर रुजलेली होती. या मुळांची छावणीही केल्याचे खोदल्यामुळे उघडकीस आले.
कारवाईत अख्खा विभाग सहभागीगणोरी, निधोना शिवारात मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती समजताच संपूर्ण एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईत सहभाग नोंदवला. अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात निरीक्षक ए. जे. कुरेशी, राहुल गुरव, नारायण डहाके, शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक जी. एस. पवार, एस. बी. रोटे, ए. ई. तातळे, भरत दौंड, जी. बी. इंगळे, बालाजी वाघमोडे, शीतल पाटील, शाहू घुले, शिवराज वाघमारे, प्रदीप मोहिते, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे पाटील, प्रवीण पुरी, अनंत शेंदरकर, सुभाष गुंजाळे, जवान युवराज गुंजाळ, रवींद्र मुरडकर, अनिल जायभाये, गणपत शिंदे, ठाणसिंग जारवाल, ज्ञानेश्वर सांबारे, विजय मकरंद, योगेश कल्याणकर, अमित नवगिरे, किशोर ढाले, मयूर जैस्वाल, योगेश घुनावत, राहुल बनकर, सुमित सरकाटे, सचिन पवार, शारीक कादरी, किसन सुंदर्डे, विनायक चव्हाण, अमोल अन्नदाते यांचा सहभाग होता.