खुलताबाद (औरंगाबाद ) : पावसाळा सुरू झाला तरी पावसाचा थेंब पडला नाही, यामुळे चिंतेत असलेल्या महिलांनी 'धोंडी धोंडी पाणी दे' म्हणत वरूणराजाला पावसासाठी साकडे घातले.
पावसाळा सुरू होऊन महिना होत आला तरी पाऊस पडला नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गत वर्षापासून अत्यल्प पाऊस असून सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने छोटी मोठी धरणे कोरडीठाक पडली आहेत. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच जनावरांचा पाण्याचा व चा-याचा मोठा गंभीरप्रश्न शेतक-यांना पडला आहे. यंदाच्या वर्षीतरी जोरदार पाऊस पडेल अशी आशा शेतक-यांनी केली आहे. पावसाळा सुरू झाला तरी अद्याप पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. चांगला व लवकर पाऊस पडावा म्हणून खुलताबादेतील साळीवाडा परिसरातील महिलांनी घरोघरी जावून धोंडी धोंडी पाणी म्हणत पाऊस मागितला व त्यानंतर देवाला जावून चांगला पाऊस पडण्याची विनंती केली.