छत्रपती संभाजीनगर : मे हिटमुळे शहर अगोदरच त्रस्त असताना शनिवारी सकाळी फारोळा पंपिंग स्टेशनमधील पाईप फुटला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा तब्बल २० तास बंद होता. रविवारी दिवसभर जलकुंभ भरण्याचे काम सुरू होते. सायंकाळी काही वसाहतींना पाणी देणे सुरू झाले. बहुतांश वसाहतींना पाणी मिळाले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे टप्पे जवळपास दोन दिवस पुढे ढकलण्यात आले. त्यातच एमआयडीसीने टँकरचे पाणी बंद केल्यामुळे एन-५ जलकुंभावर टँकरची गर्दी उसळली.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १०० एमएलडी योजनेवरील नवीन फारोळा पंपगृहातील पंप क्रमांक ४ चा(६७० अश्वशक्ती) पाईप तुटल्यामुळे पंपगृहामधील मेन पॅनल, मोटार, स्टार्टर, एल.टी. कॅपॅसिटर, पॅनलमध्ये पाणी शिरले. त्वरित विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. युद्धपातळीवर पाईपचे वेल्डिंग सुरू करण्यात आले. पंप उघडून आतील पाणी हीटर लावून वाळविण्यात आले. विद्युत पॅनलमधील उपकरणेही अशीच वाळविली. दुरुस्तीची सर्व कामे रविवारी पहाटे ५ वाजता संपली. त्यानंतर एकानंतर एक पंप सुरू करून टेस्टिंग घेण्यात आली.
शहरात पाणी आणण्यासाठी दुपारचे ११ वाजले. दिवसभर जलकुंभ भरून घेण्यात आले. ज्या वसाहतींना शनिवारी पाणी देता आले नाही, त्यांना सायंकाळी प्राधान्याने पाणी देण्याचे नियोजन केले, परंतु पाण्याचा दाब अतिशय कमी होता.
एक ते दोन दिवस पाणीपुरवठा पुढे ढकललापाण्याचे टप्पे एका दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याचे मनपाने जाहीर केल्याने शहरातील बहुतांश भागाला निर्जळीचा सामना करावा लागला.
टँकरचा पाणीपुरवठा बंदएमआयडीसीकडून टँकर भरण्यासाठी अडीच एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, रविवारी दुपारी एमआयडीसीने टँकरचा पाणी पुरवठा बंद केला. त्यामुळे टँकर चालकांनी एन-५ च्या जलकुंभाकडे धाव घेतली. गुंठेवारी भागात राहणाऱ्या नागरिकांची ओरड सुरू झाल्याने टँकरला पाणी द्यावे लागले. अनेक भागात टँकर न आल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली.
जुन्या शहरातही ओरड७०० मिमी व्यासाची जलवाहिनी सुरू असतानाही जुन्या शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. जिन्सी, शहागंज, बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, संजयनगर आदी भागात उशिराने पाणी पुरवठा केला जात आहे. या भागात पाण्याची जास्त ओरड सुरू आहे.