शेषराव वायाळ , परतूरतालुक्यातील विद्यार्थ्यांनी डीटीएड (शिक्षक पदविका अभ्यासक्रम) परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. प्रथम वर्षाच्या १७५ पैकी २८ तर द्वितीय वर्षाचे २३२ पैकी १४ परीक्षार्थी सोमवारी सुरू झालेल्या परीक्षेस गैरहजर होते. दरम्यान, अध्यापक विद्यालयांवरही आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.एकेकाळी डी. एड. अभ्यासक्रमास मोठे महत्त्व होते. अध्यापक विद्यालयाची पदवी मिळवली की, हमखास नोकरीची हमी असायची. झटपट शिक्षण झटपट नोकरी, अशी व्याख्या झाली होती. त्यामुळे डी.एड.साठी लाखो रूपये मोजून मोठे लोंढे वाढले होते; परंतु आता मागील सात ते आठ वर्षांत या डीएडधारकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याने विद्यार्थ्यांचा ओढा कमी होण्याबरोबरच अध्यापक विद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडली आहेत. डोनेशन तर सोडाच केवळ फिसवरही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. पूर्वी बारावी झाली की विद्यार्थी डीएडकडे हमखास वळत.जिल्ह्यासोबतच राज्यभरातील अनेक डीएड महाविद्यालयांत अर्ज भरण्यासाठी रांगा लागत. विशेष गाड्या करुन विद्यार्थ्यांची गर्दी होत असे. मात्र डीएड करुनही नोकरीची हमी राहिली नसल्याने विद्यार्थी डीएडकडे आता कानाडोळा करीत आहेत. लाखो रुपयांचे डोनेशन देऊन प्रवेशासाठी उड्या पडायच्या. ही परिस्थिती अचानक बदलली आहे. या परिस्थितीमुळे अध्यापक विद्यालयांची परिस्थितीही हलाखीची बनली आहे. दि. ९ रोजी या डी.टी.एड. परीक्षेस प्रारंभ झाला. शहरातील स्वामी विवेकांनद विद्यालयात ही परीक्षा सुरू आहे.मंठा तालुक्यातील दोन व परतूर तालुक्यातील दोन अशा चार अध्यापक विद्यालयातील प्रथम वर्षातील एकूण १७५ तर द्वितिय वर्षातील २३२ छात्र अध्यापक परीक्षेस बसले होते. मात्र आज प्रत्यक्षात प्रथम वर्षाचे २८ व द्वितीय वर्षाचे १४ परीक्षार्थी गैरहजर दिसून आले.पुढचे भवितव्य अधांतरी असल्याने या परीक्षेतही विद्यार्थ्यांना रस उरला नाही. प्रथम व द्वितीय वर्षाचे मिळून ४२ जण परीक्षेसाठी आलेच नाहीत. एकेकाळी डी.एड.च्या प्रवेशासाठी पराकोटीची स्पर्धा होती; परंतु आज ही स्पर्धा लयास जावून अध्यापक विद्यालये सलाईनवर आहेत. परतूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावातील अध्यापक विद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडली आहेत. विद्यार्थी नसल्याने ही महाविद्यालये अडचणीत सापडली आहेत. शासनाने काही उपाययोजना करावी, अशी मागणी काही संस्थाचालक तसेच शिक्षकांतून ऐकावयास मिळते. पूर्व परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थी संख्या वाढू शकते, असा सूर काही जण व्यक्त करीत आहेत.
डी.टी.एड.परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ
By admin | Published: June 10, 2014 12:21 AM