पैठण : तालुक्यातील नवगाव ग्रामपंचायत निवडणुकीत युवासेनेचे पदाधिकारी किशोर चौधरी यांच्या पॅनलने सर्वाधिक आठ जागा जिंकत बाजी मारली. अवघ्या एका जागेने हे पॅनल बहुमतापासून दूर राहिले. नवगावचे विद्यमान सरपंच असलेले डॉ. गुलदाद पठाण यांना चार जागांवर समाधान मानावे लागले. महाविकास आघाडीच्या नावावर निवडणूक लढविलेल्या सुरेश दुबाले यांच्या तिसऱ्या पॅनलच्या पाच उमेदवारांचा विजय झाला आहे. एकूण १७ जागा असलेल्या नवगाव ग्रामपंचायतीत तीन पॅनलचे ८, ४ व ५ असे उमेदवार निवडून आले आहेत. सरपंचपदासाठी या ग्रामपंचायतीत कोण एकत्र येतील. कोण कुणाचे सदस्य पळवतील हे येणारा काळच ठरविणार आहे.
विशेष म्हणजे, शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश दुबाले, डॉ. सुरेश चौधरी, शेरूभाई पटेल या दिग्गजांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी असलेले डॉ.गुलदाद पठाण यांच्या ताब्यात नवगाव ग्रामपंचायत होती. दोन वर्षांत ग्रामपंचायतच्या राजकारणातून निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणाचा फटका यंदा डॉ. गुलदाद पठाण यांना बसला. दुसरीकडे किशोर चौधरी यांनी नव्या दमाचे नवे उमेदवार घेऊन लढत दिली. त्यांचे एका जागेने बहुमत हुकले. सुरेश दुबाले व युसूफ मुकादम यांनी पाच जागा जिंकून दुसरे स्थान पटकावले. परंतु, दुबाले व डॉ. पठाण हे दोघेही एकाच पक्षाचे असल्याने मतविभाजनाचा त्यांना तोटा झाला. येत्या काळात दुबाले व डॉ. पठाण हे सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील का हे काळच ठरवेल.
------------
दावरवाडीवर शिवसेनेचे वर्चस्व
एकूण तेरा जागांसाठी झालेल्या दावरवाडीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिवशाही ग्रामविकास पॅनलचे तेरापैकी नऊ उमेदवार विजयी झाले. तर, परिवर्तन ग्रामविकास महाआघाडीचे चार उमेदवार विजयी झाले. ग्रामपंचायत शिवसेनेच्या उत्तमराव खांडे यांच्या ताब्यात होती. यंदा मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.
---------
पिंपळवाडी ग्रामपंचायतीवर साईनाथ सोलाट यांचे वर्चस्व
शिवसेनेच्या साईनाथ सोलाट यांनी १७ पैकी १३ जागा जिंकत पिंपळवाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले आहे. पिंपळवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच शिवसेनेचे शंकर वाघमोडे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या पॅनलच्या पदरात अवघ्या दोन जागा पडल्याने ग्रामपंचायत राजकारणात मातब्बर असलेल्या वाघमोडे यांना मतदारांनी या वेळेस सपशेल नाकारले. या निवडणुकीत दादा गलांडे यांनी वाघमोडे यांचा दणदणीत पराभव केला. जनता ग्रामविकास पॅनलचे बिलाल शेख यांच्या पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले. साईनाथ सोलाट यांनी एकहाती विजय मिळविला आहे.