मराठमोळा अभिनेता आकाश ठोसरसुद्धा सोशल मीडियावर बराच ॲक्टिव्ह असतो. आकाशनं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘१९६२ : द वॉर इन द हिल’ रिलीज झाली. त्या वेब सिरीजच्या डबिंगचा एक व्हिडिओ आकाशनं इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केला आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. दिसायला हे काम जितके सोप्पं दिसतं तितकं ते नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना याची खात्री नक्कीच पटली असणार. मोठ्या मेहनतीने आकाश समोर दिसत असलेल्या सीननुसार आवाज देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पिळदार शरीरयष्टी बनविण्यासाठी जितकी मेहनत आकाशने घेतलीय तितकीच मेहनत डब्बिंगसाठी तो करीत असल्याचं पाहायला मिळतंय.
वेगळ्या वाटेवरील 'पिकासो'चा ट्रेलर रिलीज
ॲमेझॉन प्राइमने त्यांच्या ‘पिकासो’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. यात अभिनेता प्रसाद ओक, बालकलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकदाम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पिकासो’ची कथा अस्वस्थ मद्यपी वडील व त्याच्या मुलाच्या संबंधावर आधारित आहे, तसेच यात उत्तम कथेच्या माध्यमातून दशावतार कलेची झलक पाहण्यास मिळणार आहे. कोकणामधील दुर्गम गावातील एक तरुण विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील पिकासो आर्टस् स्कॉलरशिपसाठी निवडण्यात येतो. त्यानंतर कथा आकारास येते. ‘पिकासो’चे दिग्दर्शन अभिजित मोहन वारंग यांनी केले आहे.
माझ्याविरोधात इंडस्ट्रीमध्ये कट रचला गेला
९० च्या दशकातील अतिशय लोकप्रिय कलाकारांच्या यादीमधील एक नाव म्हणजे गोविंदा. अभिनय कौशल्य आणि डान्सच्या अनोख्या स्टाइलने गोविंदाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते; पण त्याचे हे स्टारडम फार काळ टिकले नाही. एका मुलाखतीमध्ये त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमधील काही लोकं त्याच्या विरोधात कट रचत असल्याचे म्हटले आहे, तसेच या सर्वांमुळे त्याला आर्थिक फटकादेखील बसल्याची कबुली दिली. माझ्या चित्रपटांना प्रदर्शनासाठी चित्रपटगृहे मिळाली नाहीत आणि त्यांनी माझे करिअर संपविण्याचा प्रयत्न केला; पण त्या लोकांचा हा प्रयत्न असफल ठरला. मी २०२१ मध्ये धमाका करणार आहे असेही गोविंदा म्हणाला.