लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : लातूर- मुंबई एक्सप्रेस रेल्वे पूर्ववत लातूर येथील रेल्वे स्थानकावरूनच सोडावी, या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़ शुक्रवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात आले़मुंबई - लातूर ही एक्सप्रेस रेल्वे बिदरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने शुक्रवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती़ शुक्रवारी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी विधीज्ञ मंडळ, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, रेल्वे लोक आंदोलन समिती, सेव फार्मर्स विजेस् व ड्रगिस्ट असोसिएशन, रोटरी क्लब, जिल्हा मराठी पत्रकार संघ, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते़ त्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून शासन निर्णयाचा निषेध नोंदविला़ या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून ९ मे रोजी उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला़ वाशी येथील व्यापारी संघाने बाजारपेठ बंद ठेवून जिल्हास्तरीय व्यापारी संघाच्या आंदोलनास पाठिंबा दिला. व्यापारी संघाने अचानकपणे बाजारपेठ बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. हॉटेलचालकासह इतर छोट्या व्यावसायिंकांनाही याचा फटका सहन करावा लागला़ या बंदमध्ये व्यापारी संघाचे अध्यक्ष मुकुंद शिंगणापुरे, सचिव अॅड.प्रवीण पवार, सूर्यंकांत मोळवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा
By admin | Published: May 06, 2017 12:14 AM