औरंगाबाद: एलपीजी रिक्षा घेण्यासाठी माहेरूहून ३५ हजार रुपये आणावे, याकरीता पतीने बेदम मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ७ मे रोजी रात्री घडली. आंबेडकरनगर येथे झालेल्या या घटनेनंतर आरोपी पतीला अटक करण्याच्या मागणीसाठी शवविच्छेदनानंतर चार तास मृतदेह ताब्यात घेतला नाही. नातेवाईकांचा रोष लक्षात घेऊन पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा नोंदवून आरोपी पतीला अटक केली.
सय्यद रईस सय्यद कालू (वय ३०,रा. आंबेडकरनगर ), सासू खातून बी, नणंद सिबा, दीर सय्यद फिरोज, चुलत सासू शबाना आणि चुलत सासरा सय्यद अनीस अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी पती सय्यद रईसला पोलिसांनी अटक आहे. शाहिन सैय्यद रईस (वय २४)असे मृत विवाहितेचे नाव आहे.
मृताचे नातेवाईक आणि पोलिसांनी सांगितले की, शाहिन आणि रईस यांच्यात चार वर्षापूर्वी विवाह झाला. त्यांना एक चार वर्षाचा मुलगा आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून आरोपी पती सय्यद रईस, सासू खातून बी, नणंद सिबा, दीर सय्यद फिरोज, चुलत सासू शबाना आणि चुलत सासरा सय्यद अनीस हे शाहिनचा सतत शारिरीक आणि मानसिक छळ करीत होते. गेल्या काही दिवसापासून तर एलपीजी रिक्षा घेण्यासाठी माहेरहून ३५ हजार रुपये आणावे, याकरीता आरोपी पती रईस हा तिला सतत मारहाण करून छळ करीत होता. अन्य आरोपी त्याला पाठीशी घालत असत. तो कामधंदा करीत नव्हता, उलट तो सतत शाहिन यांना माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत. ७ मे रोजी रात्री आरोपी रईस आणि अन्य आरोपींनी मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडलेल्या शाहिनला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा अपघात विभागातील डॉक्टरांनी शाहिन यांना तपासून मृत घोषित केले. याविषयी शाहिनचे वडिल शेख ईस्माईल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.